उत्तर मुंबईच्या उमेदवारीवरून चंद्रकांत गोसालिया नाराज

महाविकास आघाडीच्या जागावाटपात उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ कॉँग्रेसला देण्यात आला आहे. या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी देणार हे अद्याप जाहीर झालेले नाही. दरम्यान या मतदारसंघात वर्षानुवर्षे काम करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार चंद्रकांत गोसालिया यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील मालाड-कांदिवली परिसरात अनेक विकासाची कामे आपण आमदार असताना मार्गी लावली आहेत.  लोकसभेची निवडणूक आपण यापूर्वी लढविलेली आहे. मुलगा आशीष गोसालिया हादेखील अनेक समाजोपयोगी कामे सातत्याने करत आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सायन्स आणि टेक्नॉलॉजी सेलचे अध्यक्ष व मुंबई काँग्रेस सचिव म्हणूनदेखील त्याने काम केले आहे. कोरोना काळात त्याने केलेल्या कामाची मुंबईकरांनी नोंद घेतली, मात्र काँग्रेस नेतृत्वाकडून त्याची दखल घेतली जात नाही, असे चंद्रकांत गोसालिया यांनी म्हटले आहे.