सरकार लक्ष देत नसल्याने 250 फूट खोल खाणीत उतरून आंदोलन, कर्नाटकच्या कंपनीविरोधात महिला आक्रमक झाल्या

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातल्या बरांज गावच्या महिला 250 फूट खोल खाणीत उतरल्या आहेत. अवकाळी पाऊस, गारपीटीचा मारा आणि दातखीळ बसवणारी थंडी झेलत या महिला पाण्यात उभ्या राहून आंदोलन करत आहेत. कर्नाटकातील एका कंपनी महाराष्ट्रात येऊन मनमानी कारभार करत आहे. प्रशासनाने परवानगी दिली नसतानाही कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने कोळसा उत्पादन करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आंदोलनकर्त्या महिलांनी केला आहे. चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 3 वर्षांपूर्वी या कंपनीविरोधात शंखनाद आंदोलन केलं होते. मुनगंटीवार आता कुठे आहेत असा सवाल आंदोलनकर्त्या महिला विचारत आहेत.

बरांज गावच्या लोकांनी नियमबाह्य कोळसा उत्पादनाविरोधात सुरू केलेल्या आंदोलनाचा 65 वा दिवस आहे. या आंदोलनाची सरकार पातळीवर साधी दखलही घेण्यात आली नाही असे बरांज गावच्या रहिवाशांचे म्हणणे आहे. सत्तेत नसताना जे मुनगंटीवार या प्रकल्पाविरोधात होते ते आता याबाबत का बोलत नाही असा सवालही हे ग्रामस्थ विचारत आहेत. सरकारने असेच दुर्लक्ष केले तर कोळसा खाणीतच आम्ही आत्महत्या करू असा इशारा पाण्यात उभ्या राहून आंदोलन करणाऱ्या महिलांनी दिला आहे.

या ग्रामस्थांच्या गेल्या काही वर्षांच्या मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्या खालील प्रमाणे आहेत.

  • 2014-2020 या काळात केपीसीएल कंपनी बंद होती. 15 सप्टेंबर 2016 मध्ये करण्यात आलेला करार रद्द करण्यात यावा.
  • बरांज मोकासा गावाचे पुनर्वसन चंद्रपूर- नागपूर महामार्गालगत करण्यात यावे.
  • करारामध्ये प्लॅाटऐवजी एकरकमी 5 लाखांऐवजी 15 लाख देण्यात यावे
  • प्रकल्पबाधित व्यक्तींना नोकरीऐवजी एकरकमी 15 लाख रुपये अनुदान मिळावे
  • प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी
  • बरांज मोकासा येथील 1269 घरांचे भू संपादन करण्यात यावे.
  • प्रकल्पग्रस्त आदिवासींना 5 एकर शेती व घर देण्यात यावे.