‘अदानी’ला एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीचा दणका; शिवजयंती उत्साहात साजरी

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल-1 येथील एनबीटी कार्गो विभागात शिवरायांचा पुतळा हटवून शिवजयंती साजरी करण्यास अटकाव करणाऱया ‘अदानी’ समूहाला शिवसेनाप्रणीत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) स्थानीय लोकाधिकार समितीने जोरदार दणका देत या ठिकाणी मोठय़ा उत्साहात शिवजयंती साजरी केली. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवरायांचा विजय असो’ अशा गगनभेदी घोषणा देत ‘अदानी’ला निर्वाणीचा इशारा देण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल-1 येथे एनटीबी कार्गो विभागामध्ये एअर इंडियामधील स्थानीय लोकाधिकार समितीकडून 1987 पासून छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठय़ा जल्लोषात साजरी करण्यात येते; परंतु दोन महिन्यांपूर्वी पुनर्विकासाच्या नावाखाली अदानी समूहाच्या ताब्यातील ‘एमआयएएल’ अर्थात मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या व्यवस्थापनाच्या तत्सम विकासकाने 1987 पासून प्रतिष्ठापित असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोणालाही विश्वासात न घेता जागेवरून गायब केला होता. ही बाब एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समिती पदाधिकाऱयांच्या निदर्शनास येताच त्यांनी समितीकडून अदानी व्यवस्थापनाला गेल्या दोन महिन्यांपासून पत्रव्यवहार करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा योग्य जागी बसवून देण्यास बजावण्यात आले. ही मागणी अदानी व्यवस्थापनाने विमानतळ पोलीस ठाण्यामधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासमोर लेखी स्वरूपात समितीला पत्र देऊन मागणी मान्य केली होती, परंतु अदानी व्यवस्थापनाने आजपर्यंत कोणतीही कार्यवाही केली नव्हती. त्यामुळे आंदोलन करून शिवजयंती साजरी करण्यात आली. या आंदोलनामध्ये स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे उपाध्यक्ष व एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीचे कार्याध्यक्ष उल्हास बिले, एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस प्रशांत सावंत, सह सरचिटणीस प्रवीण शिंदे, एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीचे सहसरचिटणीस व लोकाधिकार महासंघाचे चिटणीस बाळासाहेब कांबळे, एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीचे उपाध्यक्ष अजित चव्हाण, उपाध्यक्ष दीपक शिंदे, चिटणीस अमोल कदम, हेमंत गौडा, कार्याध्यक्ष सलील कोटकर, उपाध्यक्ष रवींद्र कुडाळकर आणि मराठा क्रांती मोर्चाचे किरण सावंत व शिवसैनिक उपस्थित होते.