सात रुपये जास्त सापडल्याने कंडक्टरला कामावरून काढले, आठ वर्षांनंतर कामावर घेण्याचे न्यायालयाचे आदेश

सरकारी कर्मचाऱयांना आपण हजारो, लाखो आणि कोटय़वधी रुपयांची लाच घेताना पाहिले आहे. मात्र, तामिळनाडूत एका बस कंडक्टरकडे केवळ 7 रुपये जास्त आढळून आल्याने नोकरी गमवावी लागल्याचे समोर आले. ‘भगवान के घरमे देर है, लेकीन अंधेर नही’ या वाक्याप्रमाणे एक दोन नव्हे तर तब्बल आठ वर्षांनी या कंडक्टरला न्याय मिळाला. मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू राज्य परिवहन महामंडळाला फटकारले असून, एका आठवडय़ात कंडक्टरला पुन्हा कामावर घेण्याचे आदेश दिले आहेत. टीएनएसटीसीने कंडक्टरला सुनावलेल्या शिक्षेने न्यायालयाच्या अंतर्आत्म्याला धक्का बसला आहे.

हे प्रकरण 2015 चे असून, तामिळनाडू राज्य परिवहन महामंडळाने बसमध्ये तपासणी केली. यावेळी बस कंडक्टर अय्यनार यांच्या कलेक्शन बॅगमधून तिकिटानुसार 7 रुपये जास्त आढळून आले. 10 डिसेंबर 2015 रोजी, महामंडळाने सांगितले की, यामुळे महसूल बुडाला. त्यानंतर तातडीने कंडक्टर अय्यनार यांना तत्काळ प्रभावाने बडतर्फ केले. महामंडळाच्या या निर्णयाला अय्यनार यांनी मद्रास उच्च न्यायालयात आव्हान दिले. अधिवक्ता एस.एलंबाहर्ती यांनी संपूर्ण प्रकरण हाती घेतले आणि या खटल्यासाठी कोणतेही शुल्क न आकारण्याची इच्छा व्यक्त केली.त्यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती पी.बी.बालाजी यांनी चांगलेच फटकारले. सात रुपये अधिक सापडल्याने महामंडळाच्या महसुलाला फटका बसला असेल हे अकल्पनीय आहे. अय्यनारला देण्यात आलेली शिक्षा ही गुह्याच्या तुलनेत अत्यंत विषम आहे. त्यामुळे न्यायालयाच्या विवेकबुद्धीला धक्का बसतो. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अय्यनार यांना आठवडाभरात पुन्हा कामावर घेण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत.