मुख्यमंत्र्यांसोबत भेट असल्याचे सांगितले, बोट छाटणाऱ्या ननावरेंना पोलिसांनी नेले

भावाच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्यांविरोधात कारवाई होत नसल्यामुळे फलटणच्या धनंजय ननावरे यांनी आपले बोट छाटून टाकले होते. याचा व्हिडीओ त्यांनी रेकॉर्ड करून सोशल मीडियावर टाकला होता. या धनंजय ननावरे यांना मंगळवारी सकाळी 6.30 च्या सुमारास पोलीस घेऊन गेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जात असल्याचे सांगून पोलीस त्यांना घेऊन गेले आहेत. मात्र ननावरे यांची भेट मंत्रालयात होणार आहे सह्याद्री अतिथिगृहात होणार आहे की वर्षा बंगल्यावर हे अद्याप कळू शकलेलं नाहीये.

प्रकरण काय आहे ?

देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असूनही माझ्या भावाच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्यांचा छडा लावत नाहीत. त्यांना सर्व पुरावे दिले आहेत, तरीही दुर्लक्ष सुरू आहे. म्हणून यापुढे भाजपला मतदान करणार नाही, असे सांगत फलटण येथील धनंजय ननावरे यांनी मतदानाची शाई लावण्याचे एक बोटच छाटून टाकले आहे. यापुढे प्रत्येक आठवडय़ाला एक बोट छाटून ते फडणवीसांना पाठवेन, असा इशाराही त्यांनी दिला होता.

दिवंगत माजी आमदार ज्योती कलानी यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केलेले नंदकुमार ननावरे यांनी त्यांच्या पत्नी उज्ज्वला हिच्यासह आत्महत्या केली. मात्र अजूनही या घटनेचा तपास न लावल्याने ननावरे यांचा सातारा जिह्यातील फलटण येथे राहणारा भाऊ धनंजय यांनी स्वतःचेच बोट छाटून टाकले. या भयंकर प्रकारामुळे संपूर्ण फलटण तालुका हादरून गेला आहे. दरम्यान, याप्रकरणी उल्हासनगरमधून चारजणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

व्हिडीओ केला व्हायरल

धनंजय ननावरे यांनी स्वतःचे बोट छाटण्याचा व्हिडीओच सोशल मीडियावर व्हायरल केला. बऱ्याच दिवसांपासून ते गुन्हे शाखेतील तपास अधिकाऱयांची भेट घेऊन आम्हाला न्याय द्या असे विनवत होते, पण कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे आम्हाला गावात राहणे मुश्कील झाले असून सरकारमधील एक मंत्रीच यात सामील असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.