ठसा – ईश्वरनाम भाषेचे जनक

>> दिलीप प्रभाकर गडकरी

युनोतर्फे 2005 साली केलेल्या पाहणीनुसार जगात 6912 भाषा बोलल्या जात होत्या. भाषा तज्ञांच्या मते दर पंधरा दिवसांनी जगातील एक भाषा कायमची नष्ट होते. अशीच एक ईश्वरनाम भाषा 1893 साली निर्माण झाली आणि 28 सप्टेंबर 1918 रोजी नष्ट झाली. त्या भाषेचे वैशिष्टय़ म्हणजे ती एका व्यक्तीने निर्माण केली. पंचवीस वर्षे वापरली, या पंचवीस वर्षांत त्यांनी इतर कोणत्याही भाषेचा वापर केला नाही. जगात ती भाषा फक्त त्यांनीच वापरली व त्यांच्या निधनानंतर ती भाषा नष्ट झाली. हीसुद्धा ईश्वराचीच इच्छा दुसरे काय?

ईश्वरनाम भाषेचा जन्म एका चमत्कारिक प्रसंगातून झाला. या भाषेचे जनक श्री संत राममारुती महाराज 1893 साली काशीक्षेत्री आपल्या गुरुबंधूंसमवेत एका सिद्धांतावर चर्चा करण्यासाठी एका बैठकीसाठी गेले. तेथे अनेक विद्वान व्यक्ती जमल्या होत्या. एका सिद्धांतावर खूप वादविवाद सुरू होता. गुरुबंधूंनी सिद्धांतावर योग्य प्रतिपादन करण्याचा प्रयत्नं केला, परंतु विद्वानांचे समाधान झाले नाही. इतका वेळ गप्प बसलेल्या श्री संत राममारुती महाराजांनी प्रतिपादन केले. त्यामुळे सर्वांचे समाधान झाले. सर्वांनी महाराजांचे कौतुक केले, परंतु त्यांचे गुरुबंधू मात्र नाराज झाले. त्यांनी महाराजांना सागितले की, तुमचे भाष्य योग्य व निर्णयात्मक असले तरी त्यामुळे मला थोडा कमीपणा आला. हे बरोबर झाले नाही. कारण मी येथील कायमचा रहिवासी आहे. हे ऐकून महाराजांचे मन उदास झाले. नकळत का होईना, आपल्यामुळे आपल्या गुरुबंधूंना त्रास झाला. त्यामुळे महाराजांनी गुरुबंधूंच्या पायांवर डोके ठेवून क्षमा मागितली व ‘‘अशा वादासाठी यापुढे मी भाषा वापरणार नाही, या क्षणापासून मी प्राकृत भाषेचा त्याग करत आहे,’’ असे सांगितले.

महाराजांना प्राकृत भाषेचा त्याग करून मौन पाळणे शक्यच नव्हते. त्यांनी अल्पावधीत स्वतःची एक स्वतंत्र ‘ईश्वरनाम भाषा’ तयार केली. त्यात ईश्वराची फक्त बावीस नावे वापरली. ‘रामचंद्र’ या नावाचा उपयोग केवळ ईश्वरनाम घेण्यासाठी होत असे. आनंदमय स्थिती दर्शवण्यासाठी ‘श्रीराम’ शब्द वापरला जात असे (यासंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास डॉ. आशा अशोक गडकरी लिखित दोनशे सहा पानी ‘योगीराज चैतन्यमूर्ती श्री राममारुती महाराज यांचे चरित्र’ या ग्रंथातील पान नंबर 67 ते 72 वाचावे.)
महाराज स्वनिर्मित भाषेत व्यावहारिक व पारमार्थिक विषयांवसुद्धा ओघवत्या भाषेत प्रतिपादन करीत. त्यांच्या बोलण्याचा अर्थ सामान्य लोकांनासुद्धा अल्प सहवासाने स्पष्ट समजत असे. इतकेच नाही, तर ही कर्णमधुर भाषा अशीच त्यांच्या तोंडून ऐकत रहावी अशी प्रबळ इच्छा ऐकणाऱया सर्वांच्यात निर्माण होत असे. विशिष्ट व्यक्तींचे नाव व क्वचित प्रसंगी न समजलेले वाक्य दगडी रुळाने पाटीवर लिहून दाखवीत. या ईश्वरनाम भाषेत महाराज त्यांच्याकडे येणाऱया शाळकरी मुलांना अवघड गणिते सोडवून देत व त्यांच्या रीतीसुद्धा समजावून सांगत. याच भाषेत महाराज अनेक विद्वान व्यक्तींबरोबर तत्त्वज्ञानावर चर्चा करत.

ईश्वरनाम भाषा ही फक्त बावीस शब्दांचीच, तरीही परीपूर्ण होती. या भाषेशिवाय इतर कोणत्याही भाषेचा एकही शब्द तोंडातून न निघणे व बावीस ईश्वरनामाशिवाय एकही इतर कुठलेही ईश्वरनाव तोंडातून न निघणे याला प्रचंड मनोनिग्रह, दृढनिश्चय व जागरूक बुद्धी इत्यादी महान गुणांचा समुच्चय व्यक्तीच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्यांच्या अलौकिक साधुत्वाने व सामर्थ्याने ही ईश्वरनाम भाषा शेवटपर्यंत अगदी जन्मजात भाषा असल्यासारखी वापरली. हे एका सिद्ध योग्यालाच जमू शकते. महाराजांनी ही भाषा विविक्षित रीतीने बसवली होती. ते ती भाषा इतके जलद बोलत की, जणू काय आपल्या व्यवहारातीलच भाषा आहे असा भास होई. महाराजांनी 1893 पासून 28 सप्टेंबर 1918 म्हणजे निधनापर्यंत जवळ जवळ पंचवीस वर्षे ही भाषा वापरली.

ईश्वरनाम भाषा अल्पावधीत तयार केली. फक्त त्यांनीच पंचवीस वर्षे वापरली व त्यांच्या निधनानंतर त्या भाषेचा अस्त झाला. हीसुद्धा ईश्वरेच्छाच, दुसरे काय? ही जगातील एकमेव भाषा ठरेल यात शंकाच नाही.