‘ड्रीमगर्ल’चे स्वप्न भंगणार, गदर-2 आणि OMG-2च्या वादळात पालापाचोळा होण्याची भीती

सनी देओलची मुख्य भूमिका असलेला गदर-2 आणि अक्षय कुमार याची प्रमुख भूमिका असलेला OMG-2 हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करताना दिसत आहे. सध्याच्या घडीला या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. हे दोन चित्रपट चांगली कमाई करत असताना एक नवा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. गदर -2 आणि OMG-2 ज्या पद्धतीने कामगिरी करत आहेत ते पाहून हा नवा चित्रपट कशी कामगिरी करेल याकडे सिनेविश्वाचे लक्ष लागलेले आहे. आयुष्मान खुराना याची प्रमुख भूमिका असलेला ड्रीमगर्ल-2 हा चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. 2017 साली प्रदर्शित झालेल्या ड्रीमगर्ल चित्रपटाचा हा पुढील भाग आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती, तशीच कामगिरी दुसरा भागही करेल अशी निर्माता-दिग्दर्शकाला अपेक्षा आहे.

फार खर्च न करता तयार करण्यात आलेला ड्रीमगर्ल चित्रपट आयुष्मान खुराना याच्या कारकिर्दीतील सगळ्यात मोठ्या हिटपैकी एक मानला जातो. आयुष्मान खुराना हा वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध असून तो वेगवेगळे प्रयोग करायला कचरत नाही. ड्रीमगर्ल हा या प्रयोगांपैकी यशस्वी प्रयोग होता. त्यामुळेच या चित्रपटाचा पुढील भाग काढण्याचं निश्चित करण्यात आलं होतं. मात्र या चित्रपटासमोर दोन तगड्या सिनेमांचं आव्हान असणार आहे. विशेष बाब ही आहे की हे दोन्ही चित्रपट अजूनही चांगली कामगिरी करत आहेत. या दोन चित्रपटांमध्ये ड्रीमगर्ल-2चं स्वप्न भंगणार तर नाही ना अशी काळजी आयुष्मान खुराना याच्या चाहत्यांना वाटू लागली आहे.

गदर -2 आणि OMG-2 या दोन चित्रपटांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावरही या दोन चित्रपटांचीच चर्चा ऐकायला मिळते. दोन्ही चित्रपटांना चांगली प्रसिद्धी मिळाली असून त्याचाही या चित्रपटांना फायदा मिळतोय. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी ज्या पद्धतीची प्रसिद्धी या दोन चित्रपटांना मिळाली होती, किंवा ज्या पद्धतीने या दोन चित्रपटांची प्रदर्शनापूर्वी 4 दिवस आधी चर्चा सुरू होती तशी परिस्थिती ड्रीमगर्ल-2 बाबत दिसत नाहीये. ड्रीमगर्ल-2च्या प्रदर्शनाची तारीख आतापर्यंत बरेचदा बदलण्यात आली आहे, प्रेक्षकांची या चित्रपटाबाबतची उत्सुकता यामुळे कमी झाली आहे. 1 ऑगस्टला चित्रपटाचा ट्रेलर प्रसिद्ध झाला, मात्र त्यानंतरही चित्रपटाबाबत उत्सुकता फार वाढली नव्हती. रविवारपासून या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकींगला सुरुवात झाली असून तिथेही ड्रीमगर्ल-2ला थंडा प्रतिसाद मिळताना दिसतोय. सोमवार दुपारपर्यंत या चित्रपटाची फक्त 5 हजार तिकीटेच विकली गेली होती. दोन मोठ्या चित्रपटांच्या कात्रीत सापडलेल्या ड्रीमगर्ल-2चा पुढचा रस्ताही सोपा नसणार आहे कारण याच आठवड्यात जवानचा ट्रेलर प्रसिद्ध होणार आहे. हा ट्रेलर प्रसिद्ध झाला तर ड्रीमगर्ल-2ची उरली सुरली चर्चाही बंद होण्याची शक्यता आहे.