13 जिल्हय़ांवर दुष्काळाचे सावट

राज्यात यंदा अपेक्षित पाऊस न पडल्याने अनेक भागात दुष्काळसदृश परिस्थिती उद्भवली आहे. राज्यातील तब्बल 13 जिह्यांत दुष्काळाचे सावट आहे. काही जिल्हे तर थेट रेड झोनमध्ये आले आहेत, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. पाऊस कमी झाल्याने पिके करपू लागली आहेत. पावसाची अत्यंत आवश्यकता असताना हवामान विभागाच्या या माहितीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मराठवाडय़ातील 8 पैकी 6 जिह्यांत तर परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.

राज्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून, उधारीवर बी-बियाने, खते, औषधे खरेदी करून पेरणी, फवारणी केली आहे. सुरुवातीला काही दिवस पाऊस पडला, परंतु पिकांना पावसाची गरज असताना पावसाने अचानक दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मराठवाडय़ासह काही जिह्यांतील परिस्थिती गंभीर बनली आहे. राज्यातील 36 जिह्यांपैकी 13 जिह्यांत सरासरीपेक्षा पाऊस कमी पडल्याने दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. पिण्यासाठी पाणी, जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती गंभीर झाली आहे. राज्यातील 13 जिल्हे रेड झोनमध्ये आले

आहेत, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. ज्या जिह्यात पाऊस कमी झाला आहे, त्यात नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशीव, सोलापूर, सांगली, सातारा, परभणी, हिंगोली, वाशीम, अकोला, अमरावती या जिह्यांचा समावेश आहे.

पावसाची प्रतीक्षा

जून ते सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस पडतो. यात जुलै ते ऑगस्ट हे दोन महिने पावसाचे असतात. सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी होतो, परंतु या दोन्ही महिन्यांत म्हणावा तसा पाऊस पडला नाही. शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे, परंतु आगामी सात दिवसांत जोरदार पावसाची शक्यता कमीच आहे, असे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मराठवाडय़ातील 8 पैकी 6 जिल्हे रेड झोनमध्ये  

मराठवाडय़ातील 8 जिह्यांपैकी 6 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशीव, परभणी, हिंगोली या जिह्यांचा समावेश आहे. यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिह्यातील परिस्थिती गंभीर असून या ठिकाणी अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे, तर नांदेड आणि लातूर जिह्यात सरासरी पाऊस पडला आहे.

राज्यात दोन हजारांहून जास्त गावात टँकरने पाणीपुरवठा

2 हजार 195 गावांत तर 481 वाडय़ांवर टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. साताऱ्यात 97 गावांत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पुणे विभागात 200 गावांत, सांगलीत 37 गावांत, सोलापुरात 15 गावांत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

यवतमाळमध्ये चार दिवसांत सात शेतकऱ्यांच्या आत्महत्या

यवतमाळ जिह्यात गेल्या तीन दिवसात बंजारा, आदिवासी आणि दलित समाजाच्या तब्बल पाच तर बुधवारी दोन अशा एकूण सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. 16 सप्टेंबर रोजी यवतमाळ जिह्यातील मारेगाव तालुक्यातील हिवरी गावचे शेतकरी प्रवीण काळे यांनी तर 17 सप्टेंबर रोजी राळेगाव तालुक्यातील खडकीचे शेतकरी त्र्यंबक केराम आणि घाटंजी तालुक्यातील शिवणी येथील शेतकरी मारोती चव्हाण यांनी तसेच 18 सप्टेंबर रोजी यवतमाळच्या अर्जुना येथील शेतकरी गजानन शिगणे आणि नेर तालुक्यातील बाणगाव येथील शेतकरी तेवीचंद राठोड यांनी आत्महत्या केली. त्यानंतर गणेश चतुर्थीच्या  दिवशी म्हणजेच 20 सप्टेंबर रोजी जामवाडी येथील शेतकरी नितीन माने आणि वर्ध्याच्या रत्नापूर येथील शेतकरी दिनेश मडावी यांनी आत्महत्या केली.

मराठवाडय़ात कडक उन्हाळा, विदर्भातही स्थिती सुधारेना

मराठवाडय़ात अनेक भागांत अगदी कडक उन्हाळ्यासारखे ऊन पडत असल्याचे तेथील शेतकऱ्यांनी सांगितले. तर विदर्भातही काही भागांत हलका पाऊस झालेला असला तरी शेतीची परिस्थिती सुधारत नसल्याचेच चित्र असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

मराठवाडय़ात तूर आणि उडदाचे पीक घेण्याचे धाडस मराठवाडय़ातील शेतकरी करत नसल्याची माहिती धाराशीव जिह्यातील कास्टी बुद्रुक येथील शेतकरी नामदेव चव्हाण यांनी सांगितले.

पश्चिम महाराष्ट्रातही ठणठणाट

साताऱ्यात माण, खटाव तालुक्यात तर ऊस अक्षरशः करपून गेला आहे. यंदा दोन लाख रुपयांचे नुकसान होईल, असे वडूज तालुक्यातील गोपूज येथील शेतकरी महादेव जाधव यांनी सांगितले.