तब्बल दोन तासांसाठी आयफेल टॉवर रिकामा केला..निनावी फोनवरून आली बॉम्बची अफवा..

फ्रान्सची ओळख म्हणजे आयफेल टॉवर. या आयफेल टॉवरच्या आकर्षणापोटी अनेक पर्यटक येथे भेट देतात. मात्र, सलग सुट्ट्यांमुळे अनेक पर्य़टक येथे भेट देण्यासाठी आले होते. त्यांनी आयफेल टॉवरचे सौंदर्य बघितलेच..पण त्याचबरोबर थरारक अनुभवही घेतला. आयफेल टॉवरच्या कार्यालयात एक निनावी फोन आला आणि टॉवरमध्ये बॉम्ब ठेवला असून टॉवर उडवण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर प्रशासनाने सतर्कता दाखवत सर्व प्रवाशांना टॉवरबाहेर काढले आणि बॉम्बशोधक आणि बॉम्बनाशक पथकासाह टॉवर आणि परिसराची कसून झडती घेतली. अखेर बॉम्ब ठेवल्याची अफवा निघाली. त्यामुळे पर्यटकांसह प्रशासनाचा जीव भांड्यात पडला.

धमकीचा फोन आल्यानंतर परिसरच काही काळासाठी रिकामा करण्यात आला, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. शनिवार रविवार प्रदीर्घ सुट्ट्यांचा असल्याने बहुसंख्येने फ्रेंच नागरिक आणि पर्यटक आयफेल टॉवरला भेट देण्यासाठी आले होते. मात्र, अचानक आलेल्या निनावी फोनमुळे संयोजकांची आणि पर्यटकांची एकच धावपळ झाली. सारा परिसरच रिकामा करण्यात आला. आयफेल टॉवर तब्बल दोन तासांसाठी रिकामा करण्यात आला. बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन अफवा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तब्बल 2 तासांनी आयर्न लेडी पुन्हा लोकांसाठी खुली झाली. फोन करणाऱ्याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र, अद्यापही त्याबाबतचे कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.