अबब! सिंधुदुर्गात आढळला साडेअकरा फुटाचा किंग कोब्रा!!

 

सिंधुदुर्ग जिह्यातील दोडामार्ग तालुक्यात असलेल्या झोळंबे गावात साडेअकरा फुटांच्या ‘किंग कोब्रा’ साप आढळल्याने एकच खळबळ उडाली. गावात कोब्रा जातीचा साप आढळल्याने त्याला पाहण्यासाठी गावकऱयांनी गर्दी केली. वन विभागाच्या अधिकाऱयांनी गोव्यातील सर्पमित्रांच्या मदतीने सापाला पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. पश्चिम घाटामध्ये या सापाचा अधिवास असून महाराष्ट्रामध्ये केवळ दोडामार्ग तालुक्यात हा साप आढळतो. या तालुक्यातून हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच ‘किंग कोब्रा’च्या नोंदी आहेत. किंग कोब्रा सापाला ‘नागराज’ असे म्हटले जाते. दोडामार्ग तालुक्यात त्याला ‘डोम’ किंवा ‘काळा साप’ म्हणतात. हा साप विषारी असून तो लांबीने साधारण 20 फूटांपेक्षा अधिक वाढतो. किंग कोब्रा ही सापाची सर्वात विषारी जात मानली जाते. या सापाचा दंश झाल्यास माणूस दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे, हा साप आढळल्यास वन विभागाकडूनही तत्काळ दखल घेतली जाते.