पगार 20 हजार; मिळतात 10 हजार, आनंदनगर आगारात ठिय्या आंदोलन

ऐन सणासुदीत टीएमटीच्या कंत्राटी कर्मचाऱयांवर उपासमारीची वेळ आली आहे. पगार 20 हजार, परंतु हातात 10 हजार रुपये येत असल्याने टीएमटीच्या कंत्राटी कर्मचाऱयांनी आज सकाळच्या सुमारास काम बंद केले. त्यासाठी आज सकाळी घोडबंदर येथील आनंदनगर आगारात वाहकांनी ठिय्या आंदोलन केले. कपात होत असलेल्या पगाराबाबत कर्मचाऱयांनी कंत्राटदाराला विचारणा केली असता त्यांनी प्रशासनाकडे बोट दाखवले आणि प्रशासनाने कंत्राटदाराकडे बोट दाखवले. त्यामुळे पगार गायब होतो कुठे? या संभ्रमात असलेल्या कर्मचाऱयांनी जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगितले.

तीन महिन्यांपूर्वी या कर्मचाऱयांचे कंत्राट संपले आहे. तरीही त्यांच्याकडून सेवा देण्याचे काम सुरू आहे. या कंत्राटी कर्मचाऱयांना 21 हजार 851 एवढा पगार आहे. त्यापैकी 10 ते 11 हजार एवढाच पगार त्यांच्या हातात मिळतो. त्यामुळे त्यांना आलेल्या पगारात तडजोड करावी लागत आहे. गेल्या महिनाभरापासून या कंत्राटी कर्मचाऱयांकडून हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला सुरुवात केल्यानंतर प्रशासनाकडून दोन वेळा आश्वासन देण्यात आले. मात्र प्रशासन ठोस भूमिका घेत नसल्याने जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही आणि ठोक पगाराबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे कर्मचाऱयांनी सांगितले.

100 फेऱया रद्द

आनंदनगर आगारात पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास पुकारलेल्या काम बंद आंदोलनात 235 पुरुष तर 125 महिला वाहकांनी सहभाग घेतला. त्यामुळे 100 गाडय़ांच्या फेऱया रद्द झाल्या आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला प्रवाशांना वेठीस धरायचे नसून मागण्या मान्य झाल्यावर तातडीने कामावर हजर होऊ असेही यावेळी वाहकांनी सांगितले, तर यावर तोडगा काढण्याचे काम सुरू असल्याचे परिवहन सभापती यांनी सांगितले.