गीताबोध – पिता जन्मांध… पुत्र मदांध

गुरुनाथ तेंडुलकर

दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा

आचार्य उपसंगम्य राज वचन अब्रवीत् ।। 2 ।।

पश्यैतां पांडुपुत्राणाम् आचार्य महतीं चमुम्

व्यूढा द्रुपद पुत्रेण तव शिष्येण धीमता ।। 3 ।।

भावार्थ : संजय म्हणाला, राजा दुर्योधनाने व्यूहरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहिले आणि द्रोणाचार्यांजवळ जाऊन तो म्हणाला, “अहो आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्याने अर्जुनाने त्याच्या मेव्हण्याच्या म्हणजेच द्रुपद राजाच्या मुलाच्या सहाय्याने केलेली ही व्यूहरचना बघा. पांडुपुत्रांची सेना नीट बघा.”

हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्र. धृतराष्ट्राचा थोरला मुलगा दुर्योधन. हा दुर्योधन आपल्या पित्याप्रमाणे जन्मांध नसला तरी तो मदांध मात्र निश्चितच होता. त्याच्या वागण्या, बोलण्यात उद्धटपणा आणि उर्मटपणा शिगोशीग भरलेला होता. आंधळेपणा केवळ डोळय़ांचा नसतो. तो अनेक प्रकारचा असतो. माणूस मोहाने अंध होतो. सूड भावनेनेदेखील माणूस अंध होतो. विवेक लोपला की, माणूस विकारांनी अंध होतो. मनात अभिलाषा निर्माण झाली की, माणूस लोभाने अंध होतो. अनिर्बंध सत्ता सहजासहजी लाभला की, माणूस मदांध होतो. लायकीपेक्षा अधिक संपत्ती मिळाली की, माणूस मदोन्मत्त होतो. सोप्या शब्दांत सांगायचे तर त्याला माज चढतो. तो स्वत:ला सर्वश्रेष्ठ आणि इतरांना अति तुच्छ लेखू लागतो. दुर्योधन असाच मदांध झाला आहे.

तो गुरू द्रोणाचार्यांकडे जाऊन काहिशा खोचक शब्दांत म्हणाला की, “ज्या पांडवांना आणि प्रामुख्याने अर्जुनाला तुम्ही शस्त्रास्त्र विद्या शिकवलीत तेच पांडव आज तुमच्या समोर युद्धासाठी व्यूहरचना करून उभे आहेत.”

दुर्योधनाच्या बोलण्यातील खोचकपणा जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायातील ओवी ाढमांक 95 नीट समजून घ्यावी लागेल.

ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,

जो कां तुम्ही शिक्षापिला । विद्येसी वसौटा केला ।

तेणे हा सैन्यसिंधू पाखरिला देखदेख ।। (1-95 )

भावार्थ : बघा बघा, ज्याला तुम्ही शिकवले, विद्येने मंडित केले त्यानेच हा सैन्यसागर तुमच्या विरोधात उभा केला आहे. यातील ‘देखदेख’ या शब्दातच दुर्योधनाचा स्वभाव सहज समजून येतो. आपणदेखील कधीकाळी कुणावर चिडलो की, उपरोधाने म्हणतो ना ‘बघा बघा… काय झालं ते…’ त्याचप्रमाणे दुर्योधन आपल्या गुरूंना द्रोणाचार्यांना म्हणतो, ‘देखदेख.’

दुर्योधनाने द्रुपदपुत्राचादेखील उल्लेख केला आहे. द्रुपद राजा हा एकेकाळचा द्रोणाचार्यांचा गुरूबंधू आणि अत्यंत जवळचा मित्र. काही कारणाने त्या दोघांत कमालीची कटुता आणि शत्रुत्व निर्माण झाले. आज त्याच द्रुपदाच्या मुलाने पांडवांच्या सैन्याची व्यूहरचना केली होती. द्रुपद आणि त्याच्या संपूर्ण घराण्याशी असलेल्या द्रोणाचार्यांच्या मनात रुजलेल्या वैराची दुर्योधन पुन्हा एकदा आठवण करून देतो आणि पुढे म्हणतो…

अत्र शूरा महेष्वासा भीमाजून समा युधि ।

युयुधानो विराटश्च द्रुपदस्य महारथ: ।। 4 ।।

धृष्टकेतु चेकितान: काशिराजश्च वीर्यवान ष

पुरुजित कुंतीभोजश्च शैवश्च नरपुंगव: ।। 5 ।।

युधामन्युश्च पांत उत्तमौजाश्च वीर्यवान ।

सौभद्रो द्रोपदेयाश्च सर्व एव महारथा: ।। 6 ।।

या तीन श्लोकांत दुर्योधन द्रोणाचार्यांना एक-एक करून शत्रुपक्षातील महत्त्वाच्या योध्यांची नावे घेऊन आपल्याला कुणाकुणाशी युद्ध करून संपवायचे आहे याची एक संक्षिप्त यादीच देतोय. त्यात धृष्टकेतू आहे, चेकिताना आहे, काशीचे राजे आहेत, राजा कुंतिभोज आहे. युधामन्यु, पुरुजित तसेच सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू आहे. तसेच द्रौपदीचे पाचही मुलगे आहेत. हे सर्वजण वयाने लहान असले तरी परामाने मोठे आहेत. त्यातही महत्त्वाचे म्हणजे ते सर्वजण शत्रूच्या बाजूने आपल्याशी युद्धासाठी सिद्ध झाले आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची दया-माया किंवा ममता, करुणा मनात न बाळगता या सर्वांना ठार मारायला आपण सिद्ध झाले पाहिजे अशी सूचना दुर्योधन द्रोणाचार्यांना देतोय. त्यांच्या मनात शत्रूबद्दल वैरभावना जागृत ठेवण्याचा प्रयत्न करतोय.

महाभारत युद्धाच्या आधी कौरव, पांडवांनी आपापल्या मित्र राजांकडे ‘आपण आमच्या बाजूने युद्धासाठी सहाय्य करावे’ अशी विनंती केली होती. त्या विनंतीनुसार अनेक राजे आणि त्यांची सेना युद्धाला समोरासमोर उभी ठाकली होती. या युद्धाचे वेळी भगवान श्रीकृष्णाचे सैन्य कौरवांच्या बाजूने लढणार होते, तर स्वत: श्रीकृष्ण मात्र पांडवांच्या बाजूने उभा होता. किंबहुना तो स्वत: अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करणार होता. (भगवान श्रीकृष्णाची मुत्सदेगिरी आणि राजकारण पटुता याहून काय दाखवायला हवी.) भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूला उभे असताना त्यांचे सैन्य जरी कौरवांच्या बाजूने उभे असले तरी ते सैनिक खरोखर पांडवांच्या विरुद्ध कितपत युद्ध करतील यात शंकाच होती. म्हणून दुर्योधन एक-एक करून महत्त्वाचे सर्व योद्धे गुरू द्रोणाचार्यांना दाखवत आहे.

।। श्री कृष्णार्पणमस्तु ।।

[email protected]