लहानाचे मोठे केले त्याच नातवाने आजीचे दागिने चोरले

मुलगी आणि जावयाच्या निधनानंतर आजी-आजोबांनी नातवाला लहानाचे मोठे केले. पण नशा आणि मौजमजेसाठी त्याच नातवाने आजी-आजोबांचा विश्वासघात केला. मित्र म्हणाला म्हणून नातवाने आजीचे दागिने चोरून मनसोक्त मज्जा केली. याप्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हनुमंत वीर (69) असे तक्रारदार यांचे नाव असून ते भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. प्रतापनगरमध्ये वास्तव्यास असलेले हनुमंत यांच्यासोबत त्यांची पत्नी व अभय आणि आर्यन शिंदे असे दोघे नातू राहतात. हनुमंत यांची मुलगी व जावई यांचे 16 वर्षांपूर्वी निधन झाले. तेव्हापासून अभय व आर्यन अरविंद शिंदे हे दोन्ही नातू हनुमंत यांच्याकडे राहतात. हनुमंत यांनी त्यांची पत्नी कविता यांच्यासाठी सोन्याचे दागिने केले होते. ते दागिने कविता या सणांच्या दिवशी परिधान करायच्या व दागिने घरातील लोखंडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवायच्या. 10 नोव्हेंबर रोजी दिवाळीनिमित्त दागिने परिधान करायचे असल्याने हनुमंत यांनी लॉकर उघडले असता त्यात दागिने नसल्याचे आढळून आले. त्यामुळे हनुमंत व कविता यांनी घरात दागिन्यांची शोधाशोध केली. शिवाय अभय आणि आर्यन यांच्याकडेदेखील वारंवार विचारणा केली, पण दागिन्यांचा शोध लागला नाही. अखेर हनुमंत यांनी अभयला दमात घेऊन विचारणा केल्यावर बेपत्ता झालेल्या दागिन्यांचे रहस्य समोर आले. पार्कसाईट येथे राहणारा मित्र बिलाल शेख याच्यासोबत अभय नशा करतो. नशा करण्यासाठी पैसे नसल्याने बिलालच्या सांगण्यावरून अभयने जवळपास लाख रुपयांचे दागिने चोरले होते. मग बिलालने पार्कसाईट येथे ते दागिने विकून मिळालेल्या पैशांतून दोघांनी नशा तसेच मौजमजा केल्याची कबुली अभयने दिली. त्यामुळे हनुमंत यांनी दिलेल्या तक्रारीवरून भांडुप पोलीस ठाण्यात अभय आणि बिलाल शेख या दोघांवर चोरीचा गुन्हा दाखल केला.