गुजरातमध्ये तुरुंगातील आमदाराला ‘आप’चे लोकसभेचे तिकीट

तुरुंगात असलेले आपचे आमदार चैत्रा वसावा यांची भरूच लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नेत्रंग येथील सभेत जाहीर केली.

नर्मदा जिह्यातील डेडियापाडा विधानसभा मतदारसंघातील आमदार आणि पक्षाचे कार्याध्यक्ष चैत्रा वसावा सध्या वन कर्मचाऱयाला मारहाण केल्याप्रकरणी तुरुंगात आहेत. चैत्रा यांच्या समर्थनार्थ घेतलेल्या सभेत केजरीवाल म्हणाले की, हा लढा आदिवासी समाजाच्या सन्मानासाठी आहे. हा अपमान यापुढे सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश यातून भाजपला द्यायचा आहे. ते उद्या सोमवारी वसावा यांची तुरुंगात भेट घेणार आहेत.

गुजरातमध्ये आपला टिकवण्यासाठी केजरीवाल यांची धाव
वनकर्मचाऱयाला मारहाण आणि हवेत गोळीबार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी 4 नोव्हेंबर रोजी एफआयआर दाखल झाल्यानंतर फरारी झालेले वसावा यांचा अटकपूर्व जामीन अर्जही कोर्टाने फेटाळला होता. यानंतर 15 डिसेंबर रोजी त्यांनी आत्मसमर्पण केले. तेव्हापासून वसावा तुरुंगात आहेत. आपचे आणखी नेते आमदार भूपत भयानी यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने पाच जागा जिंकल्या होत्या. पण आता भयानीपाठोपाठ बोताडचे आमदार उमेश मकवाना आणि गारियाधरचे आमदार सुधीर वाघानी पक्ष सोडणार असल्याचीही चर्चा आहे. यामुळेच केजरीवाल यांनी आपचे अस्तित्त्व टिकवण्यासाठी गुजरातला धाव घेतली आहे.