Ultimate Kho Kho – गुजरात जायंट्स चॅम्पियन, चेन्नई क्विक गन्सवर धमाकेदार विजय

अल्टीमेट खो-खोच्या सीझन 2 चा महामुकाबाला शनिवारी गुजरात जायंट्स आणि चेन्नई क्विक गन्स यांच्यात पार पडला. या अंतिम सामन्यात गुजरात जायंट्सने चेन्नई क्विक गन्सचा 31-26 असा 5 गुणांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. गुजरात जायंट्सला एक कोटी रुपये आणि चषक, उपविजेत्या चेन्नई क्विक गन्सला 50 लाख रुपये व चषक, तर तृतीय क्रमांकाच्या ओडिशा जगरनॉट्सला 30 लाख रुपये व चषक देऊन गौरवण्यात आले. अंतिम लढतीमध्ये सुयश गरगटेला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

चेन्नई क्विक गन्सने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण घेतले व गुजरात जायंट्सला आक्रमणासाठी आमंत्रित केले. शेवटच्या व चौथ्या टर्नमध्ये गुजरात जायंट्सने चेन्नई क्विक गन्सला 29-10 अशी 19 गुणांची आघाडी घेत 20 गुणांचे आव्हान दिले होते. गुजरातच्या पहिल्या तुकडीतील तीनही खेळाडूंना सव्वा मिनिटात, तर दुसऱ्या तुकडीतील खेळाडूंना जवळपास सव्वा तीन मिनिटात बाद करत चेन्नई क्विग गन्सने 12 गुण मिळवत जोरदार मुसंडी मारली. चेन्नईने गुजरातच्या तिसऱ्या तुकडीतील दोन खेळाडूंना लवकर बाद केले, मात्र शेवटी संकेत कदम नाबाद राहिला आणि त्याने गुजरातला विजय मिळवून दिला.

तृतीय क्रमांकाच्या सामन्यात ओडिशा जगरनॉट्सने तेलगु योध्दासचा 32-24 असा 8 गुणांनी दणदणीत पराभव केला व कांस्य पदकाला गवसणी घातली. या सामन्यात बी. निखीलला उत्कृष्ट आक्रमक, आदित्य गणपुलेला उत्कृष्ट संरक्षक तर दिलीप खांडवीला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.