गुजरात टायटन्सच्या स्टार खेळाडू रॉबिन मिंजचा अपघात

आयपीएल 2024 सुरू व्हायला अवघे काही दिवसच उरले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना होणार आहे. परंतु आयपीएल सुरू होण्यापूर्वीच गुजरात टायटन संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. आधी जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीच्या पायाला दुखापत झाल्याने तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे आणि आता 3.60 कोटी रुपयांना विकला गेलेला रॉबिन मिंजचाही अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमध्ये मोटारसायकल चालवत असताना त्याचे दुचाकीवरचे नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. या अपघात मिंजच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. तसेच त्याच्या बाईकच्या पुढील भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. रॉबिनच्या वडिलांनीच त्याचा अपघात झाल्याची माहिती दिली आहे. ”रॉबिन मोटारसायकल चालवत असताना त्याच्या व आणखी एका बाईकची धडक झाली. या धडकेत रॉबिन जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत”, असे त्याच्या वडिलांनी सांंगितले.

रॉबिन मिंज मूळचा झारखंडच्या गुमला जिल्ह्याचा आहे. रॉबिनला आयपीएल 2024 च्या लिलावात 3.60 कोटी रुपयांना गुजरातने विकत घेतले आहे. रॉबिन मिंज त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो.