तब्बल तीन तास हार्बर लोकलचा खोळंबा, कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना लेटमार्क

पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱया लोकलचा दुसऱया क्रमांकाचा डबा सकाळी 11 वाजून 35 मिनिटांच्या सुमारास फलाटात शिरतानाच प्लॅटफॉर्म क्रमांक 2 जवळ रुळावरून घसरला. त्यामुळे तब्बल तीन तास रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला. कडक उन्हामुळे तापलेला पत्रा आणि उन्हाच्या झळांमुळे अंगातून वाहणाऱया घामाच्या धारा अशा कात्रीत प्रवासी अडकले. अनेक कर्मचाऱयांना कामावार लेटमार्क लागला तर अनेक कर्मचाऱयांची नियोजित कामे रखडली.

लोकलचा डबा नेमका कुठल्या कारणामुळे घसरला याबाबतच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी सांगितले. जागच्या जागी थांबलेल्या लोकलमध्ये प्रवासी बसून होते. कुठल्याही प्रकारच्या उद्घोषणा केल्या जात नव्हत्या. त्यामुळे अनेकांनी रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त केला. अखेर सीएसएमटी आणि मस्जिद बंदरदरम्यान अडकलेल्या लोकलमध्ये कर्मचाऱयांनी एकेका डब्यात जाऊन लोकल मस्जिद बंदरच्या पुढे जाणार नाही आणि फलाट क्रमांक 4 वरून सीएसएमटी स्थानकापर्यंत जाऊ शकता असे सांगितले. त्यानंतर अनेक कर्मचाऱयांनी लोकलमधून उतरून सीएसएमटी स्थानक गाठले.

रस्तेमार्गेही गोंधळ

अनेकांनी मस्जिद बंदर स्टेशनबाहेरून सीएसएमटीला जाण्यासाठी बस, टॅक्सी पकडली. मात्र, येथेही उन्हाच्या झळांनी प्रवासी प्रचंड हैराण झाले. त्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेमुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. दरम्यान, हार्बर मार्गावरील रेल्वे प्रवाशांना त्याच तिकिटावर मुख्य मार्गावरील कुर्ला स्टेशनपर्यंत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती.

तासभराने लोकल वाहतूक सुरळीत

लोकलचा रुळावरून घसरलेला डबा पुन्हा रुळावर आणण्याचे काम सुरू होते. त्यामुळे सुमारे तासभर हार्बरच्या धीम्या मार्गावरील वाहतूक बंद होती. वडाळा ते सीएसएमटीपर्यंत अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. इतर गाडय़ा वडाळ्यापर्यंतच चालवण्यात आल्या. वडाळ्यापासून पुन्हा परतीचा प्रवास सुरू होता. या घटनेचा मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी तब्बल तीन तास लागले.