मुंबई विद्यापीठाला हायकोर्टाचा दणका; परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्याला अपात्र ठरवण्याचा निर्णय रद्द

बीकॉम एफएम अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याला प्रवेश दिला. मात्र दोन वर्षांनंतर अचानक परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्याला त्या अभ्यासक्रमासाठी अपात्र ठरवणाऱया मुंबई विद्यापीठाला उच्च न्यायालयाने दणका दिला. विद्यार्थ्याला अशा प्रकारे अपात्र ठरवून त्याचे शैक्षणिक नुकसान करता येणार नाही, असे बजावत न्यायालयाने विद्यापीठाचा निर्णय रद्द केला.

खारघर येथील साई सेशा अभिनय कल्लेपल्ली या विद्यार्थ्याने अॅड. मंजिरी पारसनीस यांच्यामार्फत रिट याचिका केली होती. त्यावर निर्णय देताना न्यायमूर्ती अतुल चांदुरकर आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने विद्यार्थ्याला मोठा दिलासा दिला. बीकॉम फायनान्शिअल मार्पेट अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पहिल्याच प्रयत्नात बारावी उत्तीर्ण होण्याची अट विद्यापीठाने घातली होती. याचिकाकर्ता साई पहिल्या प्रयत्नात एका विषयात अनुत्तीर्ण झाला. मात्र ऑक्टोबरच्या परीक्षेत त्या विषयात यश मिळवले. नंतर डी.वाय. विद्यापीठातून बारावीला समतुल्य असलेला एक वर्षाचा ‘बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन’ अभ्यासक्रम पहिल्याच प्रयत्नात पूर्ण केला. त्यातील चांगल्या गुणाच्या आधारे साईला बीकॉम एफएम अभ्यासक्रमाकरिता प्रवेश देण्यास विद्यापीठाने पात्र ठरवले होते. पुढे दोन वर्षांत चार सत्रांचे शिक्षण पूर्ण केले. मात्र पाचव्या सत्रा वेळी परीक्षेच्या तोंडावरच साईला अचानक अपात्र ठरवून परीक्षेचे हॉल तिकीट देण्यास नकार देण्यात आला. विद्यापीठाचा हा निर्णय रद्द करीत न्यायालयाने विद्यार्थ्याला मोठा दिलासा दिला.

न्यायालयाचे आदेश

 याचिकाकर्त्या विद्यार्थ्याला बीकॉम एफएम अभ्यासक्रमासाठी अपात्र ठरवत मुंबई विद्यापीठाने 24 ऑगस्ट 2023 रोजी जारी केलेला आदेश रद्द केला जात आहे.

 मुंबई विद्यापीठ आणि नेरुळच्या एसआयईएस महाविद्यालयाने याचिकाकर्त्याला बीकॉम एफएम अभ्यासक्रमाच्या पाचव्या आणि सहाव्या सत्राची परीक्षा देण्यास मुभा द्यावी.