विजयाष्टमी! विश्वचषकात पाकड्यांना सलग आठव्यांदा हरवले

>> मंगेश वरवडेकर

हिंदुस्थानने हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानला सात विकेट्सनी चिरडले. खूप मोठी हाइप लाभलेल्या सामन्यात हिंदुस्थाननेच एकहाती वर्चस्व सिद्ध केले. आधी गोलंदाजांच्या वादळापुढे पाकिस्तानची मोठय़ा धावांच्या किनाऱयावर लागणारी नौका बुडाली, तर नंतर रोहित शर्माच्या ‘षटकारबाजी’ने पाकिस्तानी गोलंदाजीच्या चिंधडय़ा उडवत हिंदुस्थानची वर्ल्ड कप विजयाष्टमी साजरी केली. विजयाच्या हॅटट्रिकमुळे हिंदुस्थानने गुणांचा षटकार ठोकत गुणतालिकेत नंबर वन स्थान मिळवले आहे.

हिंदुस्थानी गोलंदाजांच्या भेदकतेपुढे पाकिस्तानचे आठ फलंदाज 36 धावांत फसले तेव्हाच हिंदुस्थानी चाहते हसले होते. ‘जीतेगा भाई जीतेगा’च्या घोषणांनी पूर्ण स्टेडियम पेटून उठले होते. हा आवाज कानठळय़ा बसवणारा नव्हता. स्फूर्तिदायक होता. पाकिस्तानचा 191 धावांत फडशा पाडला तेव्हाच हिंदुस्थानने सामना जिंकला होता. त्यानंतर मैदानात भवानी तलवार घेऊन उतरल्यासारखा रोहित शर्मा खेळला. तो सलामीवीरासारखा खेळलाच, पण त्याने कर्णधाराला साजेसा खेळ केला. त्याला शतकासह विजयाचे अष्टक पूर्ण करायचे होते, पण तो 86 धावांवर अडकला, पण तोपर्यंत विजयाची केवळ औपचारिकता उरली होती. शुबमन गिलने आपला पहिला वर्ल्ड कप सामना खेळताना चार चौकार मारले, पण त्याला खूपच घाई होती आणि तो बाद झाला. पुढे पाकिस्तानविरुद्ध सातत्याने खेळणारा विराट कोहलीही लवकर बाद झाला. पण रोहित उभा होता. त्याने श्रेयसच्या साथीने पाकिस्तानचे विजयाचे मनसुबे उद्ध्वस्त करत 77 धावांची भागी रचली. ही भागी रचताना रोहितचे उत्तुंग षटकार डोळय़ांचे पारणे फेडत होते. त्याने सहा षटकार आणि सहा चौकार खेचत केलेली दिवाळीपूर्वीच आतषबाजी केली. शतकापूर्वीच बाद झाल्यामुळे तो काहीसा निराश झाला, पण पुढे श्रेयसने फार वेळ काढला नाही आणि आपले अर्धशतक साजरे करत 31 व्या षटकातच विजयाचे औक्षण केले.

त्याआधी वन डे वर्ल्ड कपच्या इतिहासात हिंदुस्थानने सलग सात स्पर्धांत पाकिस्तानचा पराभव करत आपलीच सत्ता असल्याचे वारंवार सिद्ध केले आहे. या सात विजयांपैकी सहा विजय हिंदुस्थानने प्रथम फलंदाजी करत मिळविले होते. त्यामुळे नाणेफेक जिंकूनही क्षेत्ररक्षण घेतल्यामुळे काळजाचा ठोका चुकला. अहमदाबादच्या पाटा खेळपट्टीवर पाकिस्तानचे दोन विकेट लवकर टिपून हिंदुस्थानने चांगली सुरुवात केली होती, पण त्यानंतर पाकिस्तानी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने आपले बस्तान बसवले. त्यांची वेगाने वाढत चाललेल्या भागीदारीने लाखापेक्षा अधिक संख्येने असलेल्या हिंदुस्थानी चाहत्यांना शांत केले होते. मैदानात चक्क स्मशानशांतता पसरली होती. पाकिस्तानच्या चौकार-षटकारावर ना एक टाळी वाजत होती ना घोषणाबाजी होती. तरीही बाबर-रिझवानने हिंदुस्थानी संघाचा घामटा काढला.

अन् गोलंदाजांची जादू चालली

डावाचे तिसावे षटक सुरू होते. पाकिस्तानचा 2 बाद 155 धावा झाल्या होत्या. जल्लोषाच्या मूडमध्ये बाबर-रिझवानने मिठाचा खडा टाकून सर्वांचे तोंड खारट केले होते. चाहते आपले संतुलन गमावत त्यांना अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहात होते. ‘बहोत हो गया रिझवान-बाबर, अब खोदो उनकी कबर…’, काही घोषणा ऐकवत नव्हत्या अन् तेव्हाच मोहम्मद सिराजच्या एका चेंडूने जादू केली. बाबरचा त्रिफळा उडवून त्याने जोडीच फोडली नाही, तर हिंदुस्थानी संघात आणि चाहत्यांमध्ये चैतन्य आणले. यानंतर जे काही घडले ते अद्भुत होते. हिंदुस्थानच्या सर्व गोलंदाजांनी विकेट बॉम्बब्लास्टची सीरिजच घडवून आणत फक्त 36 धावांत पाकिस्तानच्या डावालाच उडवून दिले. 2 बाद 155 वरून पाकिस्तान सर्वबाद 191 असा नेस्तनाबूत झाला. बुमरा, सिराज, जाडेजा, कुलदीप आणि पंडय़ा साऱयांनीच पाकिस्तानी फलंदाजांना मैदानातून पळवून लावण्याची करामत केली. पाचही जणांनी दोन-दोन विकेट घेतल्या.