सत्याचा शोध -पराधीन नाही पुत्र मानवाचा

चंद्रसेन टिळेकर << [email protected] >>

परमेश्वर अन् परमेश्वरी इच्छा अन् त्या इच्छेशिवाय झाडाचे पानही हलत नाही याची दवंडी पिटणारी माणसं खरं तर जगभर दैवी नशेत वावरताना दिसतात. मग हिंदुस्थानसारख्या मुळातच अडाणी, अज्ञानी असणाऱया राष्ट्रात त्यांची मांदियाळी जिथं तिथं दिसावी यात काही नवल नाही, पण आपल्या देशासारखे पृथ्वीतलावरील मागासलेले देश सोडले तर जगात इतरत्र सातत्याने परिवर्तनाचे पा चालूच असते. अज्ञानाच्या दलदलीतून बाहेर पडून ज्ञानगंगेत स्नान करण्याचा त्यांचा ध्यास असतो. ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हा नकारात्मक संदेश अव्हेरून ‘आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार’ हे मनोमन जाणले पाहिजे. या जाणिवेतूनच आपल्या कुटुंबाचा, समाजाचा आणि पर्यायाने देशाचा विकास होणार आहे!

सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयांचे

परंतु तेथे भगवंताचे, अधिष्ठान पाहिजे!!

श्री समर्थ रामदासांची ही उक्ती प्रारब्धवाद्यांची अत्यंत आवडीची. आवडीची कारण ती त्यांच्या प्रारब्धवादांचे समर्थन करणारी अन् प्रयत्नवादाचे खंडन करणारी. प्रारब्धवाद्यांची तळी उचलून धरणारी, त्यांचा दैववाद  कुरवाळणारी. साहजिकच नशीब, प्रारब्ध, भाग्य, पूर्वसंचित, विधिलिखित इत्यादी अवास्तव गोष्टींच्या विरोधात कोणी नुसता ‘ब्र’ जरी काढला तरी त्याचे तोंड तत्काळ बंद करायला समर्थांची ही उक्ती त्यांना सोयीची ठरते. हर्षवायू झाल्यासारखी मग ही मंडळी  प्रयत्नवाद्यांना बजावतात, खरे तर खिजवतात. बघा बघा, खुद्द समर्थ रामदासांनी ग्वाही दिली आहे की, तुम्ही कुठलीही चळवळ करा किंवा उपाम  करा किंवा आणखी काहीही पराम करायला जा, पण त्यासाठी भगवंताचे अधिष्ठान नसेल, म्हणजेच प्रत्यक्ष परमेश्वराचा आशीर्वाद नसेल तर तुमची धडपड, प्रयत्न कुचकामी आहेत. मग तुम्ही कितीही जीव तोडून प्रामाणिकपणे एखादे काम करा, भले ते काम कितीही चांगले असो, पण भगवंताच्या मनात नसेल तर तुम्हाला यश मिळणार नाही म्हणजे नाहीच. मग त्या भगवंताला जगन्नियंता म्हणा, अल्ला म्हणा किंवा गॉड जीजस म्हणा, त्याची मर्जी हवी म्हणजे हवीच!  तुमच्या प्रयत्नांच्या ऊर्मीला विचारतो कोण ?

परमेश्वर अन् परमेश्वरी इच्छा अन् त्या इच्छेशिवाय झाडाचे पानही हलत नाही याची दवंडी पिटणारी माणसं खरं तर जगभर दैवी नशेत वावरताना दिसतात. मग हिंदुस्थानसारख्या मुळातच अडाणी, अज्ञानी असणाऱया राष्ट्रात त्यांची मांदियाळी जिथं तिथं दिसावी यात काही नवल नाही, पण आपल्या देशासारखे पृथ्वीतलावरील मागासलेले देश सोडले तर जगात इतरत्र सातत्याने परिवर्तनाचे पा चालूच असते. अज्ञानाच्या दलदलीतून बाहेर पडून ज्ञानगंगेत स्नान करण्याचा त्यांचा ध्यास असतो. आता तर त्यांच्या हातात विज्ञानरूपी अमोल आणि अत्यंत काटेकोर असं विश्वासार्ह साधन आलं आहे. विज्ञानाच्या सहाय्याने त्यांची अंतिम सत्याकडे केव्हाच घोडदौड सुरू झाली आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन हा आता तेथे निबंधाचा विषय राहिला नसून ती त्यांची जीवन पद्धती झाली आहे.

 पाचशे वर्षांपूर्वी विज्ञानसूर्याने ‘देव देव’ करणाऱया अन् उठता बसता कपाळाला हात लावून दैववादाच्या अंधारात झोपलेल्या हिंदुस्थानसकट सर्व पौर्वात्य राष्ट्रांवर उगवण्याऐवजी आपली ज्ञानकिरणे पाश्चिमात्य देशांवर उधळण्याचं ठरवलं. त्यासरशी ‘हां हां’ म्हणता सारी पश्चिम विज्ञान किरणांनी उजळून गेली. विज्ञानसूर्याचे तेज प्यालेले ते पश्चिमेचे सूर्यपुत्र मग जग जिंकायला निघाले आणि बोल बोल म्हणता त्यांनी हिंदुस्थानसारख्या अफाटकाय देशालाही आपले गुलाम करून टाकले. एखाद्या जनावराच्या गळ्यात जशी दोरी बांधतात तशी पारतंत्र्याची दोरी त्यांनी आमच्या गळ्यात अन् गुलामगिरीची बेडी पायात ठोकली. देवभोळ्या आणि दैवखुळ्या राष्ट्राचे यापेक्षा वेगळे ते काय होणार होतं?  हा सगळा इतिहास अगदी ताजा असतानाही या देशातले परंपरावादी प्रारब्धवादी प्रयत्नवाद्यांची खिल्ली उडवीतच राहिले. आपल्या अज्ञानाचे टाळ बडवीतच राहिले. ‘भगवंत भगवंत’ म्हणून नाचतच राहिले.  त्यांनी जराही असा विचार केला नाही की, पश्चिमेकडचे ते परके, ज्यांना या देशाचा भगवंत मान्य नाही, ते आपल्या देशाभोवती गुलामगिरीचे पाश आवळीत असता एकाही देवाला जाग कशी आली नाही? एकाही देवाला आम्हाला गुलाम करणाऱया त्या गोऱया फिरंग्याचे हात कोपरापासून उखडावेत असं का वाटलं नाही? विज्ञानाच्या स्पर्शाने तेजाळलेल्या त्या कठोर गोऱया साहेबाला इथली दैववादी माणसं इतकी खालच्या पातळीवरची निर्बुद्ध वाटली की, ‘इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाऊड’ अशा पाटय़ा लावण्यापर्यंत त्यांची मजल गेली. याबद्दल ना आमच्या काशीच्या विश्वेश्वराला संताप आला ना जगन्नाथ पुरीच्या जगन्नाथाला ाढाsध आला. ना कुठल्या जागृत देवस्थानातल्या देवाची झोप उडाली. हे सगळं माहीत असूनही आम्ही दैववादाची घंटा युगानुयुगे बडवीतच राहिलो अन् भगवंताच्या इच्छेशिवाय झाडाचं पानही हलत नाही हे आळवीतच बसलो. सगळ्या घटनांच्या पाठीमागे भगवंताचीच इच्छा असते हे जर मान्य केलं तर इंग्रजांनी आम्हाला गुलाम करून श्वानाच्या पंक्तीला बसवलं हीदेखील परमेश्वरी इच्छाच होती असं मान खाली घालून  मान्यच करावं लागेल. हे आमच्या प्रारब्धवाद्यांना कळेल तो सुदिन!

सगळ्यात खेदाची बाब ही आहे की, अनेकदा आपण हिंदुस्थानी आपला अज्ञात शक्तीवरचा विश्वास जगजाहीर करतो आणि आपले हसे करून घेतो. काही वर्षांपूर्वी ‘गणपती दूध पितो’ या अफवेवर विश्वास ठेवून सर्व देशच हाती मिळेल त्या भांडय़ात दूध घेऊन रस्त्यावर धावत होता आणि सर्व जग गालातल्या गालात हसत होतं. तीच गोष्ट ‘चांद्रयान-3’ हे चंद्रावर उतरण्यापूर्वीची. ते सुरळीत उतरावे म्हणून ठिकठिकाणी यज्ञ केले गेले, नवस बोलले गेले, पूजापाठ झाले. केवळ भाविक जनांची निरुपद्रवी श्रद्धा म्हणून या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कारण अशा मानसिकतेमधूनच दैववाद पसरतो की, जो परिवर्तनाला मोठा अडसर ठरतो.

All said and done, मग प्रश्न असा पडतो की, समर्थ रामदासांनी तरी असं म्हटलं तर अविवेकी उपदेश का करावा? इथे सावरकर थोडेसे आपल्या मदतीला येतात. ते म्हणतात, शक्तीची उपासना करणाऱया रामदासांच्या मनातला देव आणि आपल्या मनातील ‘असेल हरी तर देईल खाटल्यावरी’ या  उक्तीतील देव वेगळा असला पाहिजे. सावरकर तर पुढे असेही म्हणतात की,  पालनकर्ता म्हणून माणूसच देवाच्या गळी बळेबळेच पडत आहे. तो कोणाला मारीत नाही. ते आणखी एक पाऊल पुढे जाऊन म्हणतात, पूर्वजन्म अन् पूर्वसंचित ही प्रारब्धवाद्यांची सामान्यांची फसवणूक करणारी शक्कल आहे. (संदर्भ : ‘क्ष-किरणे’ )

थोडक्यात काय, तर ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हा नकारात्मक संदेश अव्हेरून ‘आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार’ हे मनोमन जाणले पाहिजे. या जाणिवेतूनच आपल्या कुटुंबाचा, समाजाचा आणि पर्यायाने देशाचा विकास होणार आहे!

 (लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून  विवेकवादी चळवळीशी निगडित आहेत)