विंडीज गडगडला हिंदुस्थान धडपडला, फिरकीचे 26 धावांत 7 विकेट

रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादवने वेस्ट इंडीजच्या फलंदाजीची 114 धावांतच फिरकी घेतल्यानंतर या धावांचा पाठलाग करताना स्टार फलंदाजांचा हिंदुस्थानही धडपडला. 23 षटकांत कोसळलेल्या विंडीजच्या 115 धावांच्या माफक आव्हानासाठी 22 षटके आणि अर्धा संघ गमवावा लागला.   

3 बाद 88 अशा समाधानकारक स्थितीत असलेल्या वेस्ट इंडीजच्या फलंदाजांनी जडेजा आणि यादवच्या फिरकीपुढे शरणागती पत्करल्यामुळे अवघ्या 114 धावांतच त्यांचा संघ गारद झाला. तर या धावसंख्येचा पाठलाग करताना एकटय़ा इशान किशनचा अपवाद वगळता हिंदुस्थानचा एकही फलंदाज विशीही गाठू शकला नाही. इशानने सामन्यातील एकमेव अर्धशतक ठोकले. विंडीज 23 षटकांत बाद झाला होता तर हिंदुस्थानला हे सोप्पे लक्ष्य गाठण्यासाठी 22.5 षटके खेळावी लागली. हिंदुस्थानचे शुभमन गिल (7), सूर्यकुमार यादव (19), हार्दिक पंडय़ा (5) आणि शार्दुल ठाकूर (1) यांनी निराशा केली. हिंदुस्थानने 97 धावांत 5 विकेट गमावल्या असताना जाडेजा (16) आणि रोहित शर्मा (12) यांनी अभेद्य खेळ करत हिंदुस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 

कसोटी क्रिकेटनंतर वन डे सामन्यातही विंडीजची फलंदाजी कचखाऊ ठरली. विंडीजच्या तिन्ही आघाडीवीरांना हिंदुस्थानच्या शार्दुल ठाकूर, मुकेश कुमार आणि हार्दिक पंडय़ाने बाद करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. पन्नाशीतच आघाडीचे तिन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर कर्णधार शाय होपने शिमरॉन हेटमायरसह संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. 15 षटकांत 3 बाद 88 अशी मजल मारल्यामुळे विंडीज हिंदुस्थानपुढे आव्हानात्मक धावसंख्या उभारेल, अशी अपेक्षा होती, पण जडेजायादवने तसे काही होऊच दिले नाही. 

आघाडीच्या तिन्ही विकेट वेगवान गोलंदाजांनी टिपल्या होत्या, पण उर्वरित सातही फलंदाज जडेजायादवने टिपले. विशेष म्हणजे शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल आणि रोमारिओ पॉवेलला जडेजाने बाद केले आणि त्यानंतर कर्णधार होप आणि तळाच्या तिन्ही फलंदाजांनी यादवच्या फिरकीपुढे नांगी टाकल्यामुळे विंडीजचा डाव 23 व्या षटकांतच आटोपला. विंडीजचे शेवटचे 7 फलंदाज 45 चेंडूंत 26 धावांत बाद झाले. जडेजाने 37 धावांत 3 तर यादवने सहा धावांत 4 फलंदाज बाद केले.