अपत्यप्राप्तीबाबत वादग्रस्त विधान- इंदुरीकर महाराज न्यायालयात ‘अनुपस्थित’; न्यायालयाने दिली पुढील तारीख

nivrutti-indurikar-1

अपत्यप्राप्तीसंदर्भात सम विषम विधानावरून वादात अडकलेले किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर या प्रकरणाबाबत न्यायालयात हजर राहण्यासाठी मंगळवारी इंदूरीकर महाराज यांना सांगण्यात आले होते. मात्र, मंगळवारी प्रकरणाची तारीख असतानाही इंदुरीकर महाराज संगमनेर न्यायालयात उपस्थित राहिले नाही. त्यामुळे खटल्याची सुनावणी 24 नोव्हेंबरला ठेवण्यात आलेली आहे. न्यायालयाने या प्रकरणी पुढची तारीख देत इंदुरीकर महाराज यांना उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

सम आणि विषम तारखेवरून आपत्य प्राप्तीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्यसचिव अॅडवोकेट रंजना गवांदे यांनी हा गुन्हा दाखल करत सर्वोच्च न्यायालयापर्यंत पाठपुरावा केला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अखेर इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

ऑक्टोबर महिन्यामध्ये इंदुरीकर महाराजांना समन्स पाठवून न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र ते न्यायालयात हजर राहिले नाहीत म्हणून पुन्हा तारीख देण्यात आली. आता यावेळीही मंगळवारी ते न्यायालयात हजर राहिले नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा इंदुरीकर महाराज यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी 24 नोव्हेंबरची तारीख देण्यात आली आहे.