पाकिस्तानला जगज्जेता बनविण्यासाठी इंझमाम पुन्हा निवड समितीवर

1992 च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला जगज्जेतेपद जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱया इंझमाम उल हककडे पुन्हा एकदा पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्षपद सोपविण्यात आले आहे. याआधीही तो 2016-2019 दरम्यान निवड समिती अध्यक्ष होता. गेल्या महिन्यात हारून राशिद यांनी निवड समिती अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्त होते. आता त्या पदाची जबाबदारी इंझमामवर सोपविण्यात आली असून संघाचे संचालक मिकी आर्थर, मुख्य प्रशिक्षक ग्रॅण्ट ब्रॅडबर्न आणि पीसीबी सचिव हसन चीमा हेसुद्धा निवड समितीत असतील.

आता या समितीवर अफगाणिस्तानविरुद्ध श्रीलंकेत होणाऱया तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी संघ निवड करावी लागणार आहे. त्यानंतर आशिया कपसाठीही त्यांना तगडा संघ निवडावा लागणार आहे. येत्या 10 ऑगस्टलाच इंझमाम हे दोन संघ जाहीर करणार आहे. या दोन्ही मालिकांमध्ये दमदार कामगिरी करणाऱया खेळाडूंना निवडण्याची जबाबदारी या नव्या निवड समितीवर असेल.