IPL 2024 – मोठा फेरबदल, मुंबईच्या रणजी संघातील स्टार खेळाडूला लॉटरी; राजस्थानकडून खेळणार

इंडियन प्रीमियर लीगच्या 17व्या हंगामाची आज 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात चेन्नईतील एम.ए. चिदंबरम मैदानावर सलामीचा सामना रंगणार आहे. आयपीएलच्या नव्या हंगामाची सुरुवात होण्यापूर्वी काही तास आधी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स संघाने मोठा फेरबदल केला आहे.

गुजरात टायटन्सचा यष्टीरक्षक फलंदाजी रॉबीन मिन्झ याचा अपघात झाला होता. त्यामुळे तो यंदा स्पर्धेला मुकणार आहे. त्याच्या जागी गुजरातने यष्टीरक्षक फलंदाज बीआर शरथ याचा संघात समावेश केला आहे. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सनेही एक बदल केला आहे.

राजस्थानने मुंबईच्या रणजी संघाला विजेतेपद मिळवून देण्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या तनुष कोटियान याचा आपल्या ताफ्यात समावेश केला आहे. तनुष ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज एडम झम्पा याची जागा घेईल. झम्पाने वैयक्तीक कारणांमुळे यंदा स्पर्धेतून माघार घेतली आहे.

बीआर शरथ हा कर्नाटकचा खेळाडू आहे. त्याने प्रथम श्रेणीचे 20, लिस्ट-एचे 43 आणि 28 टी-20 सामने खेळले आहेत. यात त्याच्या नावावर 1676 धावांची नोंद आहे. 20 लाखांच्या बेस प्राईजवर त्याला गुजरातने करारबद्ध केले आहे. तर तनुष कोटियन हा मुंबईच्या रणजी संघातील प्रमुख खेळाडू आहे. मुंबईने नुकतीच 42व्यांदा रणजी ट्रॉफी जिंकली. त्यात तनुषने फलंदाजी आणि गोलंदाजीत मोलाचे योगदान दिले होते.