IPL 2024 – चेन्नईच्या मेहमान नवाजीसाठी लखनऊ सज्ज

सलग दोन विजयांमुळे चेन्नईचा संघ जोशात आहेत तर सलग दोन पराभवांमुळे लखनऊचा ताप वाढलाय. तरीही चेन्नईची मेहमान नवाजी करण्यासाठी लखनऊ सज्ज झालाय. टी-20 वर्ल्ड कपमध्ये आपले पक्के असलेले स्थान आणखी मजबूत करण्यासाठी लोकेश राहुलला आपल्या संघाला विजयपथावर आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे तर हिंदुस्थानचा टी-20 संघात आपले स्थान निश्चित करण्याची संधी ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबेला संधी आहे. संधीचे अमेरिकेच्या तिकिटात कोण रूपांतर करतो, ते उद्याचा खेळच सांगू शकेल.

यजमान असले म्हणून जिंकण्याची परंपरा आता खंडित झालीय. कोणताही संघ कधीही जिंकू शकतो आणि कोणतेही लक्ष्य गाठण्याची क्षमता प्रत्येक संघात आहेत. त्यामुळे लखनऊतही वेगवान क्रिकेटचा झंझावाती खेळ नक्कीच पाहायला मिळेल. लखनऊला गेल्या सामन्यात कोलकात्याकडून हार सहन करावी लागली होती आणि त्यांच्या सर्वच फलंदाजांनी घोर निराशा केली होती. खुद्द कर्णधार राहुल खेळपट्टीवर उभा होता, पण तोसुद्धा 39 च्या वर जाऊ शकला नाही. दिल्लीनेही लखनऊवर सहज मात केली होती. या सामन्यातही राहुल 39 वरच बाद झाला होता, मात्र आयुष बदोनीच्या झुंजार 55 धावांनी लखनऊला सन्मानजनक मजल मारून दिली होती.

एकूणच लखनऊच्या फलंदाज आणि गोलंदाजांना आपल्या मैदानात आपला खेळ उंचवावाच लागणार. ‘स्पीडस्टार’ मयंक यादवचा तोफखाना उद्या लखनऊत धडाडण्यासाठी तयार झाली आहे. त्याच्या अनुपस्थितीत लखनऊची गोलंदाजी कमकुवत भासली होती. उद्या त्याच्या समावेशानंतर ती नक्कीच धारदार होईल. दुसरीकडे चेन्नईची गोलंदाजी अधिक तीक्ष्ण आणि भेदक असल्यामुळे लखनऊच्या चाचपडत खेळणाऱया फलंदाजांचा कसा निभाव लागतो, हे पाहणे रंजक ठरेल. चेन्नईच्या मथिश पथिराणाच्या माऱयापुढे मुंबईचे फलंदाज कोसळले होते. त्यामुळे त्याच्या वेगवान माऱयाची लखनऊला साहजिकच भीती असणारच. चेन्नईचा डेव्हन कॉनवे दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर फेकला गेला असला तरी त्यांच्या फलंदाजीला त्याचा फारसा फरक जाणवणार नाही.