खासगी विद्यापीठात इस्रोचे अभ्यास केंद्र सुरू

चंद्रयान ३ च्या यशाची मुहुर्तमेढ केल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आता अंतराळातल्या गोष्टी सर्वसामान्यांना पोचवण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं काम करत आहे. यासाठी इस्रोनं ‘स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी अवेअरनेस ट्रेनिंग’ (स्टार्ट) कार्यक्रम सुरु केला आहे. महाराष्ट्रात ॲमिटी विद्यापीठ मुंबई इथं या केंद्राची स्थापना झाली आहे. अंतराळ संशोधनचा अभ्यास करणाऱ्या स्नातक आणि स्नातकोत्तर विद्यार्थ्यांसाठी स्टार्टची आखणी करण्यात आलीय.

मिशन मंगळ किंवा चंद्रयान या दोन्ही मोहिमांमध्ये अंतराळात असलेल्या संभावित जीवसृष्टीचा अभ्यास केला जाणारेय. यासंदर्भातलं संशोधन आणि तंत्रज्ञान वाढवण्यावर इस्रोचा भर आहे. ॲमिटी विद्यापीठात सुरु झालेल्या या केंद्रात तीन आठवड्याचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणात इस्रोचे संशोधक अंतराळ संशोधनातल्या अनेक अगम्य गोष्टींचा खुलासा विद्यार्थ्यांना करून देत आहेत. या केंद्राचं उदघाटन नुकतंच इस्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांच्या हस्ते करण्यात आलं.

डॉ. सोमनाथ यांच्या मते, अंतराळ संशोधनात ज्या गोष्टी घडतायत त्याची माहिती स्टार्ट कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत. त्याद्वारे या विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण व्हावी. त्यांचा अंतराळ संशोधनाकडे कल वाढावा हा आमचा प्रयत्न आहे. याद्वारे जास्तीत जास्त अंतराळ संशोधक तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

ॲमिटी विद्यापीठात यंदापासून एमएसी इन एस्ट्रोबायोलॉजी एन्ड स्पेस सायन्स हा कोर्स सुरु होत आहे. देशातला हा अश्यापध्दतीचा एकमेव कोर्स आहे. इथं शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट इस्रोच्या विविध कार्यक्रम आणि मोहिमांमध्ये परिक्षणार्थी म्हणून काम करण्याची संधी मिळणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. डॉ. ए. डब्ल्यू. संथोष कुमार यांनी दिली आहे. वैज्ञानिक संशोधनात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या रामानुज आणि रामलिंगस्वामी शिष्यवृती असलेले प्राध्यापक हा कोर्स शिकणार असल्याचं संथोष कुमार यांनी स्पष्ट केलं.