जालन्यात बंदला हिंसक वळण; तुफान दगडफेक, ट्रक जाळला, 350 जणांवर गुन्हा दाखल

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटा येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. त्यामुळे मराठा समाज संतप्त झाला असून सरकारच्या या दडपशाहीविरोधात जालना बंदची हाक देण्यात आली होती. शनिवारी मोठ्या प्रमाणात मराठा समाज रस्त्यावर उतरला आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या महामार्ग रोखून धरण्यात आले. आंदोलकांकडून बदनापूर येथे देखील छत्रपती संभाजीनगरकडे जाणार्‍या आणि छत्रपती संभाजीनगरकडून येणार्‍या सर्व वाहनांची कोंडी करण्यात आली.

जालना शहरात आज 2 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासूनच अंबड चौफुली भागामध्ये मराठा तरुणांचा मोठा जमाव जमला होता. यावेळी आंदोलकांनी सरकार व शिंदे-फडणवीस-पवार सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. या जमावाने अंबड रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ट्रकला आग लावली. या सर्व घटनेचे छायाचित्रण करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना आणि छायाचित्रकारांना जमावाने धक्काबुक्की करत तेथून काढून देण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा मारा केला. हा मारा होताच जमावाने देखील पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली आहे. या दगडफेकीमुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. रस्त्यावर दगडांचा खच पडलेला आहे. तर इतर एक ट्रकच्या काचा फोडण्यात आल्या.

350 आंदोलकांवर गुन्हा दाखल

दरम्यान, लाठीचार्जदरम्यान आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप केला जात आहे. तसेच आंदोलकांनी पोलिसांनी कारही जाळल्याची फिर्याद देण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश राऊत यांच्या फिर्यादीवरून ऋषिकेश बेंद्रे, श्रीराम कुरणकर, राजू कुरणकर, संभाजी बेंद्रे, महारुद्र अंबरुळे, राजेंद्र कोटुंबे, भागवत तारख, दादा घाडगे, पांडुरंग तारख, अमोल पंडित, किरण तारक, अमोल लहाने, वैभव आवटे, किशोर कटारे, अविनाश मांगदरे, मयूर आवटे यांच्यासह 350 ते 350 आंदोलकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 307, 333, 332, 353, 427, 435, 120 (ब), 143, 147, 148, 149, मुंबई पोलीस कायद्याचे कलम 135 आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे करीत आहेत.