सृष्टीचे अंतरंग – निसर्ग संकेत!

>> जे. डी. पराडकर

सध्या सकाळी येणारी जाग ही घडय़ाळातील गजराने येत नसून पावशा पक्ष्याच्या ओरडण्यानेच येतेय. सुदैवाने कोकणात अजून बऱ्यापैकी झाडी अस्तित्वात असल्याने पहाटेच्या वेळी विविध पक्ष्यांचे मधुर आवाज ऐकू येतात. पक्ष्यांचे आवाज ऐकू आले की, उठावे की उठू नये? असा प्रश्न पडतो. तळहातावर मावतील एवढे हे इवले जीव सकाळच्या प्रसन्न वेळी अक्षरश जिवाच्या आकांताने ओरडत असतात. प्रत्येक पक्ष्याच्या आवाजातून काहीतरी अर्थबोध होत असतो. पक्ष्यांच्या आवाजात नुसता गोडवाच नाही, तर आपल्या मधुर वाणीतून ते मानवाला काहीतरी संदेश आणि संकेत देण्याचे काम करीत असतात.

दरवर्षी ठरावीक वेळी पक्षी मानवाला संकेत देण्याचे  निसर्ग कर्तव्य बजावतात. निसर्गातील या खूणगाठींचा कोकणच्या ग्रामीण भागातील माणसांना पक्का अनुभव असतो. यापैकी एक म्हणजे चातक. पावसाच्या सुरुवातीला त्यांची उपस्थिती जाणवते. हळू असणारा या पक्ष्याचा आवाज पुढे वाढत जात असंख्य चातक पक्षी एकापाठोपाठ एक ओरडायला सुरुवात करतात आणि त्यांच्या आवाजाने परिसर अक्षरश दुमदुमून जातो. विशेष म्हणजे सकाळपासून त्यांचे ओरडणे सुरू होते आणि पुढे फार तर तासभर हे आवाज येत असतात. त्यानंतर दुसऱ्या दिवसापर्यंत या पक्ष्यांचा आवाज ऐकू येत नाही. कोकणच्या ग्रामीण भागात असे सांगितले जाते की, आकाशातून पडणारा पावसाचा पहिला थेंब आपल्या चोचीत झेलण्यासाठी पावशा पक्षी आतुर झालेला असतो. पावसाची अस्वस्थ होऊन हा पक्षी वाट पाहतो म्हणून याला ‘चातक’ असे नाव दिले गेले असावे. यावरूनच ‘चातकासारखी वाट पाहणे’ हा वाक्प्रचार रूढ झाला असावा. चातक पक्ष्याप्रमाणे निसर्गातील अन्य घटकांकडूनसुद्धा पावसाच्या आगमनाबाबतचे संकेत दिले जातात.

मृग नक्षत्राच्या सुरुवातीला ‘पावशा’ हा पक्षी शेतकऱ्यांना पाऊस येणार असल्याची चाहूल देतो असा समज आजही आहे. आकाराने कबुतराएवढय़ा असलेल्या पावशा पक्ष्याची लांब चोच, अंगावर पट्टे, नर आणि मादी दिसायला सारखे, त्यामुळे शिकारी पक्ष्यासारखाही तो दिसतो. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच चातकाचे थवे आकाशात घिरटय़ा घालताना दिसतात. पावसाबरोबर चातक पक्षी स्थलांतर करतो. आफ्रिका खंडातून हिंदुस्थानकडे पावसासोबत या पक्ष्याचे आगमन होते. चातकाचे आगमन झाल्याबरोबर शेतकऱ्यांनाही पावसाची चाहूल लागते. पावसाचे थेंब झाडावर पडल्यानंतर पानाच्या टोकाला चोच लावून हा पक्षी पाणी पितो तसेच ऑक्टोबरनंतर पाऊस कमी झाल्यानंतर तळ्यातील पानांवरील दव टिपतो. ऑक्टोबर, नोव्हेंबरनंतर चातक पक्ष्यांच्या स्थलांतराला सुरुवात होते. चातक पक्ष्यांना पावसाळी पाहुणे म्हणूनही संपूर्ण मध्य हिंदुस्थानात ओळखले जाते. हा पक्षी स्वत:चे घरटे बांधत नाही असे मानले जाते. आकाराने मैना या पक्ष्यासारखा हा पक्षी दिसतो. सध्या या पक्ष्यांच्या आगमनाने आसमंत भरून गेला आहे. त्यात कावळ्याचे घरटे बांधणे हादेखील शुभ संकेत असल्याचे बोलले जाते. कावळा कोणत्या झाडावर घरटी बांधतो. त्यावरून पाऊस किती पडणार? असा अंदाजदेखील अनेकजण वर्तवितात. कावळ्याने आंब्यासारख्या झाडांच्या पूर्वेला वा पश्चिमेला घरटे बांधले तर पाऊस भरपूर पडतो. काटेरी झाडावर बांधले तर पाऊस कमी पडतो, असाच सर्वसाधारण ग्रामीण भागात समज  आहे.

पाऊस दोन-चार दिवसांत पडणार म्हटल्यानंतर सरडा आपला नेहमीचा रंग बदलतो. हे एवढे बारीक निरीक्षण ग्रामीण भागातील माणसांशिवाय अन्य कोण बरं करणार? निसर्ग आपल्यातील बदल मानवासाठी संकेत म्हणून लक्षात आणून देत असतो. सरडा रंग बदलतो हे बऱ्याच जणांना ज्ञात आहे. मात्र कोणत्या हंगामात तो कोणता रंग धारण करतो हे कळण्यासाठी निसर्गासोबत डोळसपणे जगावे लागेल. सायंकाळच्या वेळी प्रकाशाकडे झेपावणारे आणि अचानक जमिनीतून शेकडो नव्हे, तर हजारोंच्या संख्येतून आपोआप वर येणारे छोटे कीटक पहिल्या सरींपूर्वीच दाखल होतात. अवघ्या काही तासांचे आयुष्य असलेल्या या कीटकांची एकाच वेळी सर्व ठिकाणी उत्पत्ती होणे म्हणजे खरंच निसर्ग चमत्कार मानला पाहिजे. पहिल्या सरींच्या पूर्वी हे कीटक दिव्यांभोवती दाखल होतात. काही वेळात त्यांचे पंख गळून पडतात आणि त्यानंतर जमिनीवर सुरू असणारी त्यांची वळवळदेखील थांबते. हा प्रकारदेखील वारंवार होत नाही. पावसाच्या पहिल्या सरी जमिनीवर विसावल्या की, चातकाची प्रतीक्षा संपते आणि त्याचे जिवाच्या आकांताने सुरू असणारे ओरडणे थांबते. लाखोंच्या संख्येने काही वेळासाठी हजेरी लावलेले कीटक परत दिसत नाहीत. पावसाच्या थेंबाचे मातीशी मीलन झाले की, या अपूर्व आनंदातून धरणी शहारते आणि एक अनोखा गंध आसमंतात पसरतो. प्रत्येक सजीव निसर्गातील या अनोख्या मीलनातून दरवळणारा गंध घ्यायला आतुर असतो.

परिसरात लखलखणारे काजवे पाहून या सोनेरी प्रकाशसरीत न्हाऊन निघाल्याचा आनंद अचानक अनुभवता आला. निसर्गाची काय ताकद आहे! पहिल्या सरी जमिनीवर झेपावण्यापूर्वी त्यांच्या स्वागताला काजवा हा इवलासा कीटक आपला सोनेरी प्रकाश घेऊन हजर झालेला असतो. पहिल्या सरी कोसळण्यापूर्वी काजव्यांची उपस्थिती म्हणजे पाऊस कोसळणार हा निसर्गाचा संकेत असतो. असं असलं तरीही पहिल्या सरींच्या स्वागताला सोनेरी प्रकाश घेऊन हा कीटक निसर्गात दाखल होतो असे आपण म्हटले तर यात दोघांचाही नक्कीच उचित सन्मान होऊ शकेल. काजव्याचे अस्तित्व मात्र पहिल्या सरींनंतरही कायम असते. मुसळधार पावसातही काजवे तेवढय़ाच संख्येने पाहायला मिळतात. कोकणच्या ग्रामीण भागात पावसाळ्यात रात्रीच्या वेळी दूरवरून चालत येताना अंधाऱ्या रात्री चमचमणाऱ्या काजव्यांचा सोनेरी प्रकाश म्हणजे एक प्रकारची निसर्गाची जिवंत सोबत मानली जाते.

इवलेसे मृग. फार तर चार-पाच दिवसांचे आयुष्य असेल. मात्र या अल्प जीवनात निसर्गाच्या सोबत आनंदात राहून हवे असतानाच निघून जातात. त्यांचा जन्म आणि मृत्यू या आकलन न होणाऱ्या बाबी आहेत. मात्र मृग नक्षत्रात हे वेल्वेटसारखी पाठ असणारे अगदी छोटे मृग किडे मातीच्या ढेकळातून जणू डोंगर चढत असल्याचा आव आणत वावरत असतात. मृग किडे हादेखील निसर्गाने मानवाला दिलेला संकेतच आहे. लहान मुलांना जसे काजव्यांचे आकर्षण तसेच या मृग किडय़ांचे. आकाराने अगदीच छोटय़ा असलेल्या मृग किडय़ाला स्पर्श करणेदेखील जिवावर येते. त्यांच्या मुलायम पाठीला स्पर्श करण्यासाठी मन आसुसलेले असते. मात्र स्पर्शाने त्यांचे अंग शहारण्याऐवजी जखमी तर होणार नाही ना? अशी शंका मनाला स्पर्शून जाते. सर्व पाय एकाच वेळी मिटून घेत पडून राहणारा हा कीटक मुलांच्या खास निरीक्षणाचा विषय ठरतो. मृग किडे फार संख्येने नाही तरीही आपले संकेतांचे अस्तित्व दाखवून जातात. पूर्वी मोठय़ा संख्येने दिसणारे मृग किडे आता मात्र नाममात्र संख्येने दिसतात.

रातकिडय़ांची कानी कीर्र कीर्र! ही किरकिर एवढी त्रासदायक असते की, रातकिडा जर घरात असेल तर त्याला शोधून मारावा तरी लागतो अथवा पकडून बाहेर सोडावा लागतो. अगदी छोटय़ा आकाराचे रातकिडे थेट घरात येऊन ओरडतात. मोठय़ा आकाराचे रातकिडे घरात येत नाहीत. ते दाट झाडीत पानांच्या आड असतात आणि त्यांचा आवाज सहन होण्यापलीकडील असतो. खरं तर व्यवस्थित निरीक्षण केल्यानंतर लक्षात येते की, रातकिडा हा प्रत्यक्ष ओरडतच नाही. त्यांच्या पंखांच्या वेगवान हालचालीतून तो ‘कीर्र कीर्र’ आवाज येत असतो. या इवल्याशा कीटकाच्या पंखांच्या कंपनामध्ये केवढी ताकद दडलेली असते ती आवाजानंतरच लक्षात येते. मुसळधार पावसात काळोख्या रात्री जर रातकिडय़ांची ‘कीर्र कीर्र’ नसेल तर सारे भयाण शांत वाटेल. ही शांतता नक्कीच भीतीदायक ठरेल. कदाचित अशा अनेक कारणांमुळे निसर्गाने कीटकांच्या या विविध आवाजांचे संगीत साथीला ठेवलेले असावे. रातकिडय़ांप्रमाणेच बेडकांचे आवाज एकमेकांशी चढाओढ करणारे भासतात. पाऊस…अर्थातच पाणी हेच बेडकांचे जीवन असल्याने पावसाळ्यात ते जेवढे आनंदी असतात तेवढे अन्य हंगामात नक्कीच नसतात. पाऊस येण्यापूर्वीच त्याच्या आगमनाचे संकेत देण्यासाठी त्यांचे ओरडणे सुरू होते, ते पावसाळा संपेपर्यंत कायम असते. या काळात त्यांची उत्पत्तीदेखील मोठय़ा संख्येने होत असते.

निसर्गाकडून मिळणारे हे सारे संकेत म्हणजे केवळ अंदाज आणि शक्यता नसतात. निसर्गातील प्रत्येक घटकाकडून मिळणाऱ्या संकेतानुसार पुढे सारे घडत असते. खरं तर या साऱ्या हालचाली विज्ञानाशी निगडित असतात. निसर्गाबाबतचे कुतूहल वाढत जाणारे असते. या  साऱ्या संकेतांना शास्त्राrय आधार असल्याने केवळ ग्रामीण भागातील अनुभवी माणसे सांगतात म्हणून बदलाच्या त्या गोष्टी घडतात असे नव्हे. पावसाच्या आगमनापूर्वीपासून हा हंगाम संपेपर्यंत जन्माला येणारा प्रत्येक निसर्ग घटक हा अभ्यासाचा विषय आहे.

[email protected]