कल्याणमध्ये शिवजयंतीच्या देखाव्याला आक्षेप, शिवसेनेच्या ‘निष्ठावंत मावळ्यां’ची पोलिसांना पोटदुखी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार अवघ्या महाराष्ट्रात अपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. पण ऐतिहासिक कल्याण नगरीत मात्र शिवसेनेच्या निष्ठावंत मावळय़ांची पोलिसांना पोटदुखी असल्याचे दिसून आले आहे. शिवसेनेच्या रामबाग शाखेने उभारलेल्या याबाबतच्या देखाव्याला पोलिसांनी आक्षेप घेतला आहे. शिवशाहीत ज्यांनी घडवलं त्या राजाच्या पायाशी निष्ठा व्यक्त करणारे मावळे आणि लोकशाहीत ज्यांनी घडवलं त्याच्याच पाठीत खंजीर खुपसणारे मावळे असा हा देखावा असून सर्वसामान्य कल्याणकरांनी या देखाव्याचे स्वागत केले आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते विजय साळवी यांच्या नेतृत्वाखाली कल्याणमध्ये शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यात लोकशाही व शिवशाही हा चित्ररथ लक्षवेधी ठरला. दिवसभर त्याची चर्चा सुरू होती. चित्ररथाच्या फलकावर म्हटले आहे, हिरोजी इंदुलकर यांनी रायगड किल्ला बांधल्यानंतर शिवाजी महाराज म्हणाले की, तुला हवे ते मागू शकतोस. तेव्हा हिरोजींनी एकच मागितले. रायगडाच्या एका पायरीवर माझे नाव लिहिलेले असावे. शिवशाहीत ज्यांनी घडवलं त्या राजाच्या पायाशी निष्ठा व्यक्त करणारे मावळे. लोकशाहीतील मावळे दाखवताना मात्र ज्यांनी घडवलं त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसणारे या चित्ररथात दाखवले आहेत.

जे सत्य आहे तेच दाखवले

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशाहीमध्ये कसे निष्ठावान मावळे होते व आताच्या लोकशाहीत पाठीत खंजीर खुपसणारे कसे मावळे आहेत यावर आधारित देखावा सादर करणे गैर ते काय? लोकशाहीत नीतिमत्ता राहिलेली नाही हेच त्यातून स्पष्ट होते. जे सत्य आहे ते आम्हाला दाखवू द्या. घटनेने आम्हाला अधिकार दिले आहेत. या घटनेचीदेखील पोलिसांना पायमल्ली करायची असेल तर खुशाल करा. त्यांनी फक्त नीतिमत्तेच्या बाजूने राहावे एवढेच आमचे म्हणणे आहे.
– विजय साळवी शिवसेना उपनेते