अरेरे! कर्नाटकात भाजपला विरोधी पक्षनेता मिळेना; पक्षातील आमदारांनी दिला अल्टिमेटम; काँग्रेसने घेतला चिमटा

कर्नाटक विधानसभा निवडणुका होऊन जवळपास सहा महिन्यांनंतर देखील विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यात आलेली नाही. यामुळे आधीच विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या भाजपवर स्वपक्षातील आमदारांमध्ये कमालीची नाराजी आहे. ही नाराजी पक्षाचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुधवारी अगदी स्पष्टपणे दिसल्याचं सागंण्यात येत आहे.

पक्षाने विरोधी पक्षनेत्याची (LoP) नियुक्ती न केल्याबद्दल भाजपच्या आमदारांनी निराशा आणि नाराजी व्यक्त केली आहे. इंडिया टुडे टीव्हीनं सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त प्रसिद्घ केलं आहे. विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती न केल्यास बेळगाव येथील आगामी हिवाळी विधानसभा अधिवेशनात उपस्थित न राहण्याची धमकी आमदारांनी दिली.

बंगळुरूमध्ये झालेल्या अंतर्गत बैठकीदरम्यान, भाजप आमदारांनी सांगितलं की भाजपनं अद्याप विरोधी पक्षनेत्याचं नाव निश्चित न केल्यामुळे काँग्रेसकडून सतत टीका होत आहे. हा अत्यंत लाजिरवाणा प्रकार असून त्यांच्याकडे उत्तर देण्यास काहीच नाही, असं सूत्रांनी सांगितलं.

भाजपमधील एका व्यक्तीनं नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितलं की त्यांच्या एका आमदारानं येडियुरप्पा यांना सांगितलं की ते विरोधी पक्षनेत्या शिवाय हिवाळी अधिवेशनात उपस्थित राहणार नाहीत.

या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना येडियुरप्पा म्हणाले की, भाजप बेळगाव येथील हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेता नियुक्त करण्यासाठी सर्व प्रयत्न करेल. हा निर्णय पक्षाच्या हायकमांडवर सोपवण्यात आल्याचं देखील त्यांनी नमूद केलं.

काँग्रेसनं भाजपची उडवली खिल्ली

काँग्रेसनं भाजपच्या अंतर्गत परिस्थितीवरून त्यांच्यावर ताशेरे ओढले आणि राज्याच्या राजकीय इतिहासात अशी परिस्थिती निर्माण झाली नसल्याचं म्हटलं आहे.

‘जवळपास सहा महिने झाले आहेत आणि ते (भाजप) विधानसभा आणि विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते देखील नियुक्त करू शकत नाहीत’, असा टोला काँग्रेस नेते दिनेश गुंडू राव यांनी लगावला आहे.

‘कर्नाटक भाजप आमदारांसाठी ही एक लाजिरवाणी परिस्थिती आहे. यावरून त्यांच्या पक्षाची वाईट परिस्थिती दिसते आणि त्यांचं दुःख प्रतिबिंबित होत आहे’, असंही ते पुढे म्हणाले.

10 मे रोजी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बहुमत मिळवले आणि 135 जागांवर दावा करत सरकार स्थापन केलं होतं. भाजप अवघ्या 66 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर होता आणि जेडीएसला फक्त 19 जागा मिळाल्या होत्या.