कोल्हापूर जिल्हय़ात पूरस्थिती कायम! 49 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा 41.4 फुटांवर स्थिर

कोल्हापूर जिल्ह्यात आज दुसऱ्या दिवशीही पावसाने काहीशी उसंत घेतली. दोन दिवस उघडलेले राधानगरीचे पाच स्वयंचलित दरवाजे रात्री उशिरा बंद झाले. मात्र, आज दुपारी पुन्हा एक स्वयंचलित दरवाजा उघडण्यात आला. सायंकाळपर्यंत जिह्यातील 49 बंधारे पाण्याखाली होते. अलमट्टी धरणातून वाढविलेला विसर्ग पाहता जिह्याचा पुराचा वेढा उठेल असे वाटत होते. मात्र, आज दिवसभरात पंचगंगेच्या पातळीत केवळ 1 ते 2 इंचाची घट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पुन्हा एकदा नव्याने पुराची खरी कारणे शोधावी लागणार आहेत.

बुधवारी दिवसभरात राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडून 8 हजार 450 क्युसेक विसर्ग सुरू होता. काल रात्री उशिरापर्यंत हे सर्व दरवाजे बंद झाले होते. पावसाचा जोर कमी होण्यासह धरणाचे दरवाजे बंद झाल्याने यंदा महापुराचा धोका टळला. पण, गेल्या चार दिवसांपासून इशारा पातळीवर दीड ते सव्वा दोन फूट (41.4) स्थिर असलेल्या पंचगंगेच्या पातळीत आज सकाळी एक इंचाने घट झाली, तर सायंकाळी सहापर्यंत केवळ दोन इंचाची घट झाली. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पंचगंगेची पातळी 41 फूट 1 इंचावर स्थिर झाली होती.

पंधरा धरणांत 73.50 टीएमसी पाणीसाठा

कोल्हापूर जिह्यातील एकूण 15 धरणसाठय़ांत सध्या 73.50 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातील सध्याचा पाणीसाठा टीएमसीमध्ये व कंसात टक्केवारी ः राधानगरी 8.27 टीएमसी (98.96 टक्के), वारणा 29.24 (85.02), तुळशी 2.11 (60.81), दूधगंगा (काळमवाडी) 16.54 (65.14), कासारी 2.28 (82.09), कडवी 2.52 (100), कुंभी 2.22 (81.74), पाटगाव 2.95 (79.31), चिकोत्रा 1.02 (67.25), चित्री 1.58 (83.89), जंगमहट्टी 1.07 (87.82), घटप्रभा 1.56 (100), जांबरे 0.82 (100), आंबेओहोळ 1.11 (89.23), कोदे 0.21 (100). तसेच सध्या राधानगरीतून 2828 क्युसेक विसर्ग, वारणा 6788, कासारी 1000, कडवी 845, कुंभी 300, घटप्रभा 1219, जांबरे 822 आणि कोदेमधून 743 क्युसेक विसर्ग सुरू होता.