आंबेगाव – लांडेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात तिघे जखमी, परिसरात भीतीचे वातावरण

आंबेगाव तालुक्यामध्ये मानव आणि पाळीव प्राण्यांवर बिबट्यांच्या हल्ल्यांचे सत्र सुरुच आहे. गुरुवारी सायंकाळी तालुक्यातील लांडेवाडी येथे बिबट्याने तीन जणांवर हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नितीन रामदास लांडे, विघ्नेश फलादे आणि सोमनाथ आढळराव अशी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे असून त्यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी स्मिता राजहंस यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन लांडे (वय – 35) हे शेतातील पाणीपुरवठा योजनेचा वॉल बंद करण्यासाठी निघाले होते. त्यावेळी रस्त्यात त्यांना बिबट्याची मादी आणि तिची दोन पिल्ले आढळली. त्याचवेळी बिबट्याच्या मादीने नितीन यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर विघ्नेश फलादे (वय – 20) आणि सोमनाथ आढळराव (वय – 40) यांच्यावरही बिबट्याच्या मादीने हल्ला करत त्यांना जखमी केले. यात विघ्नेशच्या उजव्या पायावर जखम झाली आहे. तर सोमनाथ हे बिबट्याच्या हल्ल्याच्या भीतीने दुचाकीवरून पडले आणि जखमी झाले.