मोदी घाबरलेत, आता रडण्याचे नाटक करतील; राहुल गांधी यांनी डागली तोफ

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजकाल आपल्या भाषणांमध्ये प्रचंड घाबरलेले दिसतात. कदाचित काही दिवसांनी ते स्टेजवरच रडण्याचे नाटक करताना दिसतील, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली आहे. कर्नाटकातील बिजापूर येथील प्रचारसभेला ते संबोधित करत होते. मोदी यांनी गेल्या 10 वर्षांत गरीबांकडून पैसा हिसकावून घेतला आणि 25 लोकांना दिला. 70 कोटी हिंदुस्थानींकडे जितका पैसा आहे तितका पैसा या लोकांकडे आहे. देशातील 40 टक्के संपत्तीवर 1 टक्के लोकांचे नियंत्रण आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला.

मोदी काही लोकांना अरबपती बनवतात, पण काँग्रेस सरकार कोटय़वधी लोकांना लखपती बनवेल. काँग्रेस बेरोजगारी आणि महागाई हटवेल. जितका पैसा मोदींनी अरबपतींना दिला आहे तितका पैसा आम्ही गरीबांना देऊ, असे आश्वासन राहुल गांधी यांनी जनतेला दिले. ही निवडणूक सामान्य नाही, ही निवडणूक गेल्या निवडणुकीपेक्षा वेगळी आहे. कारण, इतिहासात पहिल्यांदाच एक पार्टी आणि एक व्यक्ती देशाचे संविधान आणि लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे काँग्रेस आणि इंडिया आघाडी लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, याकडेही राहुल गांधी यांनी लक्ष वेधले.

 ही मोदींची भारतीय चोंबू पार्टी

मोदींनी विमानतळे, बंदरे, वीज प्रकल्प, खाणी, सौर ऊर्जा प्रकल्प, संरक्षण  कंत्राटे सर्व काही अदानी आणि त्यांच्यासारख्या अब्जाधीशांना दिले, परंतु गरीबांना काहीच दिले नाही, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. मोदीने भर-भर कर जनता का पैसा लुटा और बदले में पकडा दिया बस खाली लोटा… ही आहे मोदींची भारतीय चोंबू पार्टी, अशी तोफ राहुल गांधी यांनी डागली.

आदिवासी, गरीबांना संविधानाने आवाज दिला

आज हिंदुस्थानातील गरीब, मागासवर्गीय आणि आदिवासींकडे जे अधिकार आहेत, आवाज आहे, आरक्षण आहे, ते केवळ संविधानामुळेच आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. तुमचे एक मत ठरवेल की पुढचे सरकार मुठ्ठीभर अरबपतींचे असणार की 140 कोटी जनतेचे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे की त्यांनी घरातून बाहेर पडावे आणि संविधानाचा सैनिक बनून लोकशाहीच्या रक्षणासाठी मतदान करावे, असे आवाहनही राहुल गांधी यांनी केले.