नाराज आठवले फडणवीसांना भेटले; रिपाइंला केंद्रात कॅबिनेट, राज्यात मंत्रीपद द्या

लोकसभा निवडणुकीत रिपाइंला एकही जागा महायुतीकडून देण्यात आलेली नाही. यामुळे रिपाइं नेते व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले नाराज झाले आहेत. आठवले यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी केंद्रात कॅबिनेट व राज्यातही मंत्रीपद देण्याची मागणी केली.

फडणवीसांच्या भेटीनंतर आठवलेंनी महायुतीकडील मागण्यांची यादीच माध्यमांसमोर वाचून दाखवली. केंद्रात कॅॅबिनेट, राज्यात मंत्रीपद, विधानसभेत जागा, महामंडळांमध्ये वाटा आणि इतर सत्तापदांमध्ये वाटा मिळावा, अशी रिपाइंची मागणी आहे. आमची नाराजी दूर झाली, पण दिलेला ते शब्द पाळतील असे वाटतेय, असे आठवले म्हणाले.

आम्ही सुरुवातीपासून भाजपसोबत होतो. दोन मित्रपक्ष आल्याने आमची अडचण झाली आहे. आम्हाला जागांवर पाणी सोडावे लागले तरी आम्ही पाणी अडवणारे लोक आहोत. पाणी वाहून जाणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. शिर्डीची जागा मिळायला हवी होती, मिळाली नाही, पण शिर्डीपेक्षा महाराष्ट्रातून 45 जागा निवडून आणणे आवश्यक आहे.

जानकर आमचे मित्र, त्यांचे अभिनंदन, मी प्रचाराला जाणार आहे. ते पवारांना भेटून आले, जानकर तिकडे जाऊ नयेत म्हणून फडणवीसांनी त्यांना जागा दिली. देवेंद्र फडणवीस हुशार राजकारणी झालेत. मी पवारांकडे गेलो असतो तर मला जागा मिळाली असती, मी प्रामाणिक आहे, असे आठवले म्हणाले.