सांगलीच्या जागेवरून कोणतीही नाराजी नाही, शरद पवार यांचा निर्वाळा

सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून कोणीही नाराज नाही. कालच्या मुंबईतील महाविकास आघाडी नेत्यांच्या बैठकीला मी हजर होतो. तीन तास आम्ही एकत्र होतो. आम्ही संयुक्त चर्चा केली. पण कोणीही नाराजी व्यक्त केली नाही, असा स्पष्ट निर्वाळा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिला.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी शरद पवार आज सातारा दौऱयावर आले होते. कार्यकर्त्यांच्या तालुकानिहाय बैठकांनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सांगलीचा उमेदवार जाहीर केल्यामुळे तसेच मुंबईतील जागेवर दावा सांगितल्यामुळे काँग्रेसने कालच्या मुंबईतील महाविकास आघाडी नेत्यांच्या बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, शरद पवार म्हणाले, कालच्या बैठकीला मी होतो. त्यामध्ये कोणी नाराजी व्यक्त केलेली मी पाहिली नाही. तीन तास आम्ही एकत्र होतो. आम्ही संयुक्त चर्चा केली; पण कसलीही नाराजी नव्हती. कोणीही नाराजी व्यक्त केलेली नाही.

श्रीनिवास पाटील उमेदवार असणार नाहीत

सातारा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हे प्रकृतीच्या कारणास्तव यावेळी उमेदवार असणार नाहीत. कार्यकर्त्यांची मते आजमावल्यानंतर सातारच्या उमेदवारीसाठी आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने अशी नावे पुढे आली आहेत. या बाबतीत लवकरच निर्णय होईल, असे सूतोवाच त्यांनी केले.

हुकूमशाहीचा विस्तार होऊन मूलभूत स्वातंत्र्य संकटात येईल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक कशासाठी केली? त्यांचा गुन्हा काय होता? असा सवाल करीत शरद पवार म्हणाले, मद्याच्या अनुषंगाने प्रत्येक राज्यात पॉलिसी ठरवली जाते. मद्यनिर्मिती, त्याच्या वापरापासून सर्व गोष्टींची आखणी करून राज्य ही पॉलिसी ठरवते. अशी पॉलिसी ठरवली म्हणून मुख्यमंत्र्यांना अटक करणे म्हणजे हुकूमशाहीचा वेगळा अर्थ काय? हळूहळू या हुकूमशाहीचा विस्तार होईल व मूलभूत स्वातंत्र्य संकटात येईल, अशी भीती पवार यांनी व्यक्त केली. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांवरही अशीच कारवाई केली. ते आता तुरूंगात आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

तुरुंगात जाण्यापेक्षा भाजपात गेलेलं बरं

विमान खरेदी व्यवहारातील 840 कोटींच्या घोटाळा प्रकरणात अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांना सीबीआयने क्लिन चिट दिली आहे. याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता, तुरुंगात जाण्यापेक्षा भाजपमध्ये गेलेलं बरं, असे जे म्हटले जाते ते खरे ठरताना दिसत आहे, असा सणसणीत टोला शरद पवार यांनी लगावला.