उष्णतेच्या लाटेत आज मतदान, विदर्भातील 5 जागांसह देशात 102 मतदारसंघांचा कौल ईव्हीएममध्ये बंद होणार

अठराव्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूरमध्ये मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या रिंगणात विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मनात नसतानाही केवळ पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे निवडणूक रिंगणात उतरलेले राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे राजकीय भवितव्य पणाला लागले आहे. विदर्भातील रणरणत्या उन्हात मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढण्याचे मोठे आव्हान राजकीय पक्ष तसेच प्रशासकीय यंत्रणेसमोर आहे. दरम्यान, देशभरात 102 मतदारसंघांत आज मतदान होत आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे राजू पारवे, काँग्रेसचे श्याम बर्वे आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आणि निवृत्त सनदी अधिकारी किशोर गजभिये अशी तिरंगी लढत आहे.

नागपूरमध्ये गडकरींना आव्हान

नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नितीन गडकरी हे तिसऱयांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर काँग्रेसचे विद्यमान आमदार विकास ठाकरे यांचे आव्हान आहे. वंचित बहुजन आघाडीने या मतदारसंघात काँग्रेसला पाठिंबा दिल्याने या सरळ लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता लागली आहे.

भंडारा गोंदियातही तिरंगी लढत

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांचा सामना काँग्रेसच्या प्रशांत पडोळे यांच्याशी होत आहे. वंचित बहुजन आघाडीने येथून संजय केवट यांना उमेदवारी दिली आहे.

नामदेव किरसान-अशोक नेते लढत

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नामदेव किरसान आणि भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते यांच्यात मुख्य लढत आहे. वंचित बहुजन आघाडीने येथून हितेश मडावी यांना उमेदवारी दिली आहे. या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याची संपूर्ण विदर्भात उत्सुकता आहे.

मुनगंटीवारांना कठीण लढत

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर विरुद्ध भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्यात मुख्य लढत आहे. पण प्रतिभा धानोरकर यांनी मुनगंटीवार यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे.

निवडणूक कर्मचाऱ्यांना उन्हामुळे भोवळ

रामटेक आणि नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवार, 19 एप्रिलला मतदान होत आहे. आज निवडणूक मतदान अधिकारी आणि कर्मचारी नेमून दिलेल्या मतदान पेंद्रावर पोहोचले, परंतु यातील दोघांना उन्हामुळे भोवळ आली. त्यामुळे त्यांना तत्काळ 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. नागपूरमध्ये आज 41 अंश तापमान नोंदवले गेले.

पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणेने कंबर कसली आहे. या पाचही मतदारसंघांत केंद्रीय दल तसेच अन्य राज्यांचे दल मिळून 124 पंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. नक्षलग्रस्त गडचिरोली जिह्यात निवडणूक यंत्रणा व पोलिसांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर तैनात केले आहे.