काँग्रेसचे महाराष्ट्रातील 7 उमेदवार जाहीर; कोल्हापुरातून शाहू महाराज, तर सोलापुरातून प्रणिती शिंदेंना उमेदवारी

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील कॉँग्रेसच्या सात उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर झाली. कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पुण्यातून आमदार रवींद्र धंगेकर, सोलापूरमधून आमदार प्रणिती शिंदे तर ऍड. गोवळ पडवी यांना नंदुरबार, अमरावतीतून बळवंत वानखेडे, लातूरमधून शिवाजीराव काळगे आणि नांदेडमधून बळवंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

महाविकास आघाडीकडून कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराज उमेदवार असतील हे याआधीच स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार कॉँग्रेसच्या महाराष्ट्रातील पहिल्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. पुण्यातून अपेक्षेप्रमाणे रवींद्र धंगेकर यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. सोलापूरमधून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे यांना कॉँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करत महाविकास आघाडीने महायुतीपुढे तगडे आव्हान उभे केले आहे.

काँग्रेसकडून नंदुरबार, अमरावती आणि लातूर लोकसभा मतदारसंघातून गोवळ पडवी, बळवंत वानखेडे आणि शिवाजीराव काळगे या नव्या चेहऱयांना लोकसभेसाठी संधी देण्यात आली आहे.  काँग्रेस सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांनी 57 उमेदवारांची यादी जाहीर केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अनेक वर्षे प्रतिनिधित्व केलेल्या कर्नाटकातील राखीव असणाऱया गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून खरगेंचे जावई राधाकृष्ण यांना कांगेसने संधी दिली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत खरगेंना भाजपाच्या उमेश जाधव यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.

काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी यांनी पश्चिम बंगालमधील परंपरागत बेहरामपूरमधून पक्षाने पुन्हा एकदा संधी दिली आहे. चौधरी यांनी तृणमूल काँग्रेसचे उमेदवार व माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांचे कडवे आव्हान यावेळी पेलावे लागेल.

अशोक चव्हाण भाजपवासी झाल्यामुळे काँग्रेस नांदेडमधून कोणाला उमेदवारी देते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. नांदेडमधून वसंतराव चव्हाणांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.

अकोला विधानसभेसाठी साजीद खान उमेदवार

अकोला पश्चिमचे भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन झाल्यामुळे या मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या जागेसाठी कॉँग्रेसने साजीद खान पठाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे.