ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल – पक्षाच्या चिन्हावर निवडणुका नसल्या तरी सर्वांचेच विजयाचे दावे

राज्यातल्या 2359 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी लागले. या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढवल्या गेल्या नव्हत्या, तरीसुद्धा सर्वांनीच विजयाचे दावे केले. ढोलताशांच्या गजरात गुलाल उधळला. अनेक ठिकाणी तर पक्षाची चिन्हेही नाचवण्यात आली. सत्ताधारी पक्षांनी तर ही लोकसभेचीच निवडणूक असल्यासारखे आकडय़ांचे दावे करत आपले वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न केला.

ग्रामपंचायत निवडणूक ही राजकीय पक्ष स्वतः लढत नाहीत किंवा पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नाही. ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी पॅनेल्स उभी केले जातात. ही पॅनेल्स राजकीय पक्षांशी संलग्नितही असू शकतात किंवा अपक्षही असू शकतात. तरीसुद्धा विजयी झाल्यानंतर उमेदवारच आपण अमुकअमुक पक्षाचे असल्याचा दावा करत पक्षच जिंकल्याचे सांगतात. आजही तसेच झाले. सत्ताधारी भाजप, मिंधे गट आणि अजित पवार गटाने सर्वाधिक जागा जिंकल्याचे भांडवल केले. भाजप आणि मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांनी तर जणू काही देश जिंकल्यासारखाच जल्लोष केला.

नागपुरात भाजपचा सुपडासाफ

भाजपचे मूळ असलेल्या नागपूर जिह्यात भाजपचा सुपडासाफ झालेला आहे, भंडारा जिह्यातील मोहाडी तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींवर काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला असून भाजपच्या वाटय़ाला फक्त दोन ग्रामपंचायती आल्या आहेत, असेही नाना पटोले म्हणाले.

संगमनेरमध्ये थोरात गटाचे वर्चस्व

संगमनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींवर आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील गटाने वर्चस्व मिळवले. ढोलेवाडी व बोरबन या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. गुंजाळवाडी ग्रामपंचायतमध्ये सर्व जागांवर थोरात गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. आश्वी बुद्रूकमध्ये थोरात गटाने विखे गटाचे पानिपत केले. पिंपळगाव कोझिरा, घारगाव, अश्वी खुर्द ग्रामपंचायतीतही काँग्रेस पक्षाचे सदस्य विजयी झाले.

– बुलढाण्यात भाजपच्या डॉ. संजय कुटेंना धक्का बसला आहे. जिह्यातील सर्वात मोठी जामोद ग्रामपंचायत भाजपकडून काँग्रेसच्या ताब्यात गेली.

काटोल-नरखेडमध्ये अनिल देशमुखांचे वर्चस्व कायम

काटोल नरखेड तालुक्यातील 83 पैकी 64 ग्रामपंचायती जिंकत राष्ट्रवादीचे नेते माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. काटोल तालुक्यातील 52 पैकी 42 तर नरखेड तालुक्यातील 29 पैकी 24 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची सत्ता आली. तर याच मतदारसंघात येणाऱया नागपूर ग्रामीण तहसीलमधील बाजारगाव व सातनवरी या दोन्ही ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवली. खरसोली येथे जरी अजित पवार गटाचा सरपंच विजयी झाला असला तरी येथे 9 पैकी 7 सदस्य हे देशमुख गटाचे विजयी झाल्याने येथे उपसरपंच हा त्यांच्या गटाचा
होणार आहे.

सांगोल्यात आमदार शहाजीबापू पाटलांना धक्का

सांगोला तालुक्यात शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वर्चस्वाला शेकापने जोरदार झटका दिला. शहाजीबापू यांनी स्वतःच्या चिकमहूद ग्रामपंचायतीची सत्ता राखली, तरी इतर तीन ग्रामपंचायती शेकापने जिंकल्या आहेत. अजित पवार गटाच्या ताब्यातील वाढेगाव ग्रामपंचायतीवर शेकापने झेंडा फडकवला आहे. सावे ग्रामपंचायतही शेकापने राखली आहे.

पंचायतींच्या निकालांवरून वर्चस्व सिद्ध होत नाही – रोहित पवार

ग्रामपंचायत निवडणूक निकालांवरून राज्यस्तरावर कुणाचे वर्चस्व आहे हे सिद्ध होत नसते. काही ठिकाणी कुणी, किती आणि कुठल्या बाजूला मतदान केले याचा काही प्रमाणात अंदाज लागतो. ग्रामपंचायतीतल्या निवडणुकीतले आकडे घेऊन उद्या काय होईल याचे ठोकताळे लावले जात असतील तर सत्तेतल्या लोकांनी ते करावे. दिवाळीही साजरी करावी. पण लोकसभा व विधानसभेला काय होईल याचा अंदाज कदाचित त्यांना नसेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.

नगरमध्ये भाजप नेते, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना धक्का. पुणतांबा, वाकडी, चितळी ग्रामपंचायतीत विवेक कोल्हे पॅनेल विजयी
अजित पवार गटाचे दिलीप वळसे-पाटील यांना त्यांच्या आंबेगावातच धक्का बसला. वळसे-पाटलांच्या निरगुडसर गावात चुरशीच्या लढतीत त्यांना मिंधे गटाने धूळ चारली. वळसे-पाटील यांच्या 73 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला.

गडकरींच्या गावात कॉँग्रेसचा झेंडा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या धोपेवाडा गावात सरपंच पदाच्या निवडणुकीत कॉँग्रेसने झेंडा फडकवला. भाजप समर्थित निशा खडसे यांचा पराभव करत काँग्रेस समर्थित मंगला शेटे यांनी बाजी मारली. कमळेश्वर तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींपैकी 18 ठिकाणी कॉँग्रेस, तर 3 ठिकाणी भाजप समर्थित गटांना यश मिळाले.

भाजप खोटारडा; गिरे तो भी टांग उपर

राज्यात आपणच एक नंबर असल्याचा दावा भाजपने या निकालानंतर केला. भाजपचा तो दावा म्हणजे गिरे तो भी टांग उपर असा आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली. कुठल्याही पक्षचिन्हाशिवाय ज्या निवडणुका होतात त्याचे निकाल लागल्यानंतर भाजपवाले असाच खोटा प्रचार करतात, असे ते म्हणाले. हिंमत असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊन दाखवाव्यात, असे आव्हानही त्यांनी दिले.

‘मी भाजपचा’ प्रतिज्ञापत्र भरून घेतली

ग्रामपंचायत निवडणुका या कोणत्या पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नाहीत; पण भाजपने राज्यातील काही तालुक्यांमध्ये विजयी उमेदवारांकडून ‘मी भाजप समर्थित’ उमेदवार अशा आशयाची प्रतिज्ञापत्रे भरून घेतल्याची माहिती समोर आली आहे. सरपंच निवडून आल्यानंतर उमेदवारांची पळवापळवी होत असते. त्यामुळे निवडणुकीस उभ्या असलेल्या उमेदवारांकडून प्रतिज्ञापत्र भरून घेतल्याचा दावा पक्षाकडून केला जात आहे.