प्रसादामुळे कोरोना होणार नाही, खाऊन टाका! कुटुंबातील दोघांचा मृत्यू, दोघे अत्यवस्थ

छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील भिलाई जामुलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. हेमलाल वर्मा (40 वर्षे) याच्यासह त्याच्या मुलीचा मृत्यू झाला असून हेमलालची पत्नी जान्हवी (38 वर्षे) आणि त्याची दुसरी मुलगी या दोघी अत्यवस्थ आहेत. या सगळ्यांनी एक प्रसाद खाल्ला होता. हेमराजने हा प्रसाद एका बाबाने दिला असल्याचे सांगितले होते. हा प्रसाद खाल्ल्यानंतर आपल्याला कोरोनाच काय कुठलाच आजार होणार नाही असे हेमलालने सांगितले होते.

हेमलाल आणि जान्हवीला तीन मुली होत्या. सोमवारी रात्री घरी आल्यानंतर हेमलालने जान्हवी आणि त्याच्या दोन मुली प्रिया (11 वर्षे) आणि मुस्कान ( 7 वर्षे) या तिघींना प्रसाद दिला. त्यांना दिल्यानंतर हेमलालने स्वत:ही प्रसाद खाल्ला. रात्री 11 च्या सुमारास या तिघांना उलट्या व्हायला लागल्या. हेमलाल हा त्याच्या आईवडीलांसोबत राहात होता. चौघांना उलट्या सुरू झाल्यानंतर जान्हवीने हेलालच्या आईवडिलांना सगळा प्रकार सांगितला. यानंतर या चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात नेईपर्यंत हेमलालचा मृत्यू झाला होता. मंगळवारी सकाळी हेमलालची मोठी मुलगी प्रिया हिचाही मृत्यू जाला. जान्हवी आणि मुस्कान या दोघींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा सगळा प्रकार ठरवून केलेली आत्महत्या आहे. हेमलालने मुद्दाम मुलींना आणि बायकोला विष खाऊ घातलं आणि नंतर स्वत:ही खाल्लं. हेमलालची छोटी मुलगी आजीआजोबांसबोत झोपायला गेली असल्याने तिला हेमलालने विष दिलं नव्हतं. सदर प्रकाराची सखोल चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.