Manipur Violence : मतदान संपताच मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, CRPF चे दोन जवान ठार

मणिपूरमधील दोन जागांवर लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होताच पुन्हा हिंसाचार भडकला आहे. शुक्रवारी मध्यरात्री कुकी बंडखोरांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) पथकावर घात लावून हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोन जवान ठार झाले असून अनेक जखमी झाले आहेत. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

मणिपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुकी बंडखोर शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजून 15 मिनिटांनी सीआरपीएफच्या पथकावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोन जवान ठार झाले. हे दोन्ही जवान मणिपूरच्या विष्णूपूर जिल्ह्यातील नारनसेना भागामध्ये तैनात असणाऱ्या सीआरपीएफच्या 128 व्या बटालियनचे सदस्य होते.

तत्पूर्वी बंडखोरांनी कांगपोकपी, उखरूल आणि इम्फाळ पूर्व भागामध्ये गोळीबार केला. यानंतर थौबल जिल्ह्यातील हेइरोक आणि तैंगनौपाल येथेही गोळीबाराची घटना घडली आणि त्यानंतर हिंसाचार भडकला.

सर्वाधिक मतदान

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान शुक्रवारी पार पडले. एकूण 88 जागांवर झालेल्या या निवडणुकीत मणिपूरच्या एका जागेचाही समावेश होता. आउटर मणिपूर जागेसाठी एकूण 77.30 टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे बंडखोरांनी धमकावल्यानंतरही लोक मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडले आणि सर्वत्र शांततेत मतदान पार पडले, असे मणिपूरचे मुख्य निवडणूक अधिकारी प्रदीप कुमार झा यांनी सांगितले. मात्र त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला.

19 एप्रिलला इनर मणिपूरमध्ये मतदान

मणिपूरमध्ये इनर मणिपूर आणि आऊटर मणिपूर अशा लोकसभेच्या दोन जागा आहेत. आऊटर मणिपूरमध्ये 26 एप्रिलला मतदान पार पडले, तर इनर मणिपूरमध्ये 19 एप्रिलला मतदान झाले. इनर मणिपूरमध्ये जवळपास 78.78 टक्के मतदान झाले. यादरम्यान हिंसाचाराच्या अनेक घटना समोर आल्या. त्यामुळे 22 एप्रिल रोजी 11 मतदान केंद्रावर पुर्नमतदान झाले होते.