मराठा आंदोलकांचे वादळ आज मुंबईच्या वेशीवर

मराठा आरक्षणाचा लढा तीव्र झाला आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील मराठा आंदोलनाचे वादळ उद्या मुंबईच्या वेशीवर धडकणार आहे. मराठा आंदोलनाचे विराट रूप आज पुण्यात पाहायला मिळाले. लाखोंच्या संख्येने मराठा बांधव या आंदोलनात जोडले जात असून आंदोलकांचा आजचा मुक्काम लोणावळय़ात तर उद्याचा मुक्काम नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केट येथे असणार आहे.

लाखोंचा जनसमुदाय… शिस्त, संयम आणि उत्साह. एक मराठा लाख मराठा, आम्ही सारे जरांगे अशा घोषणा देत पुण्यातील वाघोलीपासून लोणावळय़ापर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी थांबलेला जनसमुदाय. कुठे पुष्पवृष्टी, कुठे औक्षण तर कुठे वाद्यांचा दणदणाट असे अभूतपूर्व स्वागत पुण्यात झाले. औंध, पिंपरी-चिंचवड, देहूरोड तळेगावमार्गे लोणावळा मुक्कामी हा मोर्चा निघाला. हे मराठा वादळ पुण्यातून मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाले.

…मंत्री छगन भुजबळ यांचा निषेध

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेल्या मोर्चात सहभागी झालेल्या मराठा तरुणांनी मोठय़ा प्रमाणात घोषणाबाजी करीत मंत्री छगन भुजबळ यांचा निषेध केला. भुजबळ यांच्या नावे घोषणाबाजी करीत तरुणांनी परिसर दणाणून सोडला.

रॅली मार्गात अंशतः बदल

पुणेकरांची अडचण लक्षात घेऊन जरांगे पाटील यांनी आज दुपारी पुणे शहरातील रॅलीच्या मार्गामध्ये बदल केला. येरवडा येथून पुणे स्टेशन मार्गे शिवाजीनगरकडे जाणारा नियोजित रॅलीचा मार्ग बदलून येरवडा तारकेश्वर मंदिर, बिंदुमाधव बाळासाहेब ठाकरे चौक, संगमवाडीमार्गे संचेती पुलावरून शिवाजीनगर असा मार्ग निवडला. त्यामुळे सर्वाधिक वर्दळ असणारा पुणे स्टेशन परिसर तसेच पुण्याच्या मध्यवर्ती भागात होणारी वाहतूककोंडी टाळता आली. मनोज जरांगे पाटील यांच्या या निर्णयाचे पुणेकरांनी स्वागत केले.

आज मुक्काम एपीएमसीत

नवी मुंबई  मराठा आंदोलकांच्या मुक्कामाचा पडाव उद्या गुरुवारी नवी मुंबईच्या एपीएमसीमध्ये पडणार आहे. या आंदोलकांच्या नवी मुंबईतील मुक्कामाचे नियोजन करण्यासाठी आज एपीएमसी प्रशासन, पोलीस, पालिका आणि मराठा समाजाचे समन्वयक यांची बैठक एपीएमसीच्या प्रशासकीय इमारतीत झाली. आंदोलकांसाठी उद्या पाच मार्केट पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.

शिंदे समितीला मुदतवाढ

राज्यभरात कुणबी जातीच्या नोंदी तपासून पात्र क्यक्तींना कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीचे दाखले देण्यासाठी नेमलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला 29 फेब्रुकारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसा शासन निर्णय आज जारी करण्यात आला.

अवजड वाहनांना नो एण्ट्री

मराठा आंदोलकांचा मुक्काम उद्या नवी मुंबईत असणार आहे. मोठय़ा संख्येने आंदोलक आणि त्यांची वाहने येणार असल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. ही दिंडी नवी मुंबईत आल्यानंतर वाहतूककोंडी होऊ नये यासाठी उद्या जड आणि अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ही वाहने नवी मुंबईत पार्कही करता येणार नाहीत, असे परिपत्रक वाहतूक शाखेचे उपायुक्त तिरुपती काकडे यांनी काढले आहे.

आंदोलकांना मुंबईत कुठे जागा द्यायची हे सरकारने ठरवायचे असून मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची तसेच जनजीवन विस्कळीत होणार नाही याची जबाबदारी सरकारनेच घ्यायची आहे, असे हायकोर्टाने बजावले आहे.