मुंबईतील उड्डाणपुलांचे बांधकाम सरकारी तिजोरीतून, टोलचा पैसा मात्र खासगी कंपनीच्या घशात

मुंबईत 2000 सालापूर्वीच्या अनेक उड्डाणपुलांचे काम सरकारी पैशातून झाले. मात्र त्याबदल्यात वसूल केला जाणारा कोटय़वधींचा टोल एमईपी या खासगी कंपनीच्या घशात जात असल्याचे उघडकीस आले आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएसआरडीसी)ने टोल वसूल करण्यासाठी मुंबईच्या पाच प्रवेश नाक्याचे कंत्राट अवघ्या 2242.35 कोटी रुपयांना एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीस दिल्याची माहिती अनिल गलगली यांना माहितीच्या अधिकाराखाली मिळाली आहे. 2010-11 पूर्वी एमएसआरडीसी स्वतः टोल वसूल करत होती. मुंबईतील 31 उड्डाणपुलांवर एमएसआरडीसीने 1058 कोटी 34 लाख 66 हजार 885 रुपये खर्च केले असून त्याचा खर्च पाच प्रवेश मार्गांवर टोल नाके बनवून वसूल केला जात आहे. वर्ष 2010-11 मध्ये एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला 19 नोव्हेंबर 2026 पर्यंत टोल वसुलीचे कंत्राट दिले गेले. त्याबदल्यात एमएसआरडीसीने 2242.35 कोटी रुपये एकरकमी घेतले.

एमएसआरडीसीने केलेली टोलवसुली

1999-2000    28.35 कोटी
2000-01        56.57 कोटी
2001-02        65.12 कोटी
2002-03        476.84 कोटी
2008-09        68.65 कोटी
2009-10        231.39 कोटी
2003-04 ते 2007-08 या पाच वर्षांची आकडेवारी उपलब्ध नसल्याचे एमएसआरडीसीने म्हटले आहे.

17 वर्षांत देखभालीवर 119 कोटी खर्च केल्याचा दावा

1999-2000 पासून 2015-16 या 17 वर्षांत 119 कोटी 44 लाख 5 हजार 750 रुपये रस्त्यांच्या देखभालीवर खर्च करण्यात आल्याचा दावा एमएसआरडीसीने केला आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर ‘टोल’चा झोल

मुंबई- पुणे महामार्गावर प्रवाशांकडून टोल वसुलीत सुरू असलेला झोल अभिनेत्री ऋजुता देशमुखने उघड केला आहे. ऋजुता म्हणाली, मी 31 जुलै रोजी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रवास केला. सामान्यपणे मुंबई-पुणे प्रवास करताना खालापूर टोलनाक्यावर 240रुपये आणि तळेगाव टोलनाक्यावर 80 रुपये टोल घेतला जातो. मी पुण्याला घरी पोहोचल्यावर माझ्या नवऱ्याला टोल संदर्भात मेसेज आला होता. त्यामध्ये खालापूरला 240 आणि तळेगावला 80 ऐवजी 240 रुपये वजा करण्यात आले होते. म्हणजे एकूण 480 रुपये टोल गेला होता. याची मी रीतसर तक्रार केली पण अजून मला त्याचे उत्तर मिळालेले नाही. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी मुंबईला येताना मॅनेजरला विचारल्यावर त्याने आता मुंबई ते लोणावळा 240 आणि लोणावळा ते पुणे 240 असे दोन भाग झाले आहेत. जेव्हापासून फास्ट टॅग सुरू झाला तेव्हापासून हे सुरू झाले असे सांगितले.