पत्रकार नसशील तर बाजूला हो! चंद्रकांत पाटील तरुणावर भडकले

पत्रकारांशी संवाद साधत असताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील एका तरुणावर चांगलेच भडकले. संबंधित तरुणाने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांबाबतचा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता, ‘तू कोण आहेस, पत्रकार नसशील तर बाजूला हो’, अशा शब्दांत पाटील यांनी त्या तरुणाला खडसावले. तसेच पोलिसांना त्या तरुणाची चौकशी करण्यास सांगितले.

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर ‘पुस्तक महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला पाटील यांनी भेट दिली. त्या वेळी ते पत्रकारांशी संवाद साधत होते. तसेच राजकीय घडामोडींबाबत भूमिका मांडत होते. त्या वेळी आंबेजोगाई येथील संबंधित तरुण उपस्थित होता. या तरुणाने पाटील यांना स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांबाबतचा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र पाटील यांनी ‘तू कोण आहेस, पत्रकार नसशील तर बाजूला हो’, असे सांगितले. या सर्व प्रकारानंतर पाटील हे पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले.