दाखवतो, बघतो, या कोल्हेकुईला मी दाद देत नाही – छगन भुजबळ

तुला दाखवतो, बघतो असल्या कोल्हेकुईला मी दाद देत नाही. मी आयुष्यभर, अगदी यांच्या जन्माच्या आधीपासून लढत आलोय, असे आव्हान मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिले.

नाशिकमध्ये शनिवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मनोज जरांगे पाटील यांच्या बीड येथील सभेत दुहेरी भाष्य आले. मराठा समाजाला डाग लावला, असे ते एका बाजूला म्हणतात. मराठा समाजाच्या नादाला लागू नका, बीडला काय होते, ते तुम्ही पाहिलेय, असे दुसऱया बाजूला म्हणतात. याचा अर्थ तुम्ही जे केलंय त्याची कबुलीच तुम्ही दिलीय. दोन्ही बाजूने भाष्य येणार नाही याची काळजी घ्या, असा सल्ला त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला. तुला बघतो, दाखवतो, अशा धमक्या दिल्या जाताय, असल्या कोल्हेकुईला मी दाद देत नाही. आयुष्यभर अशा अन्यायाच्या, दादागिरीच्या विरुद्ध मी लढत आलोय, त्यांच्या जन्माच्या अगोदरपासून लढतोय, असेही ते म्हणाले.

20 जानेवारीपासून मुंबईत उपोषण करण्याचे जरांगे पाटील यांनी जाहीर केले, त्यांच्या समर्थनार्थ मराठा समाजही तेथे जाणार आहे, असे ते म्हणतात. मराठा एक जात आहे. हा समाज सर्वात मोठा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्री, लोकप्रतिनिधी यांचे घर, पोलीस ठाणे येथे लोकशाही मार्गाने, शांततेने आंदोलन करण्यास हरकत नाही. पण, जाळपोळ करू नका, असे भुजबळ म्हणाले.