‘वंदे भारत’मध्ये प्रवाशांना मिळणार बाप्पाचा प्रसाद!

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘वंदे भारत’ ट्रेनच्या प्रवाशांना यंदा बाप्पाचा प्रसाद मिळणार आहे. राज्यात पाच मार्गांवर वंदे भारत ट्रेन धावत असून गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रवाशांना जेवणाच्या मेनूमध्ये साजूक तुपात बनवलेला मोदक गणपतीचा प्रसाद म्हणून दिला जाणार आहे. त्यासाठी रेल्वेने आयआरसीटीसीच्या माध्यमातून तब्बल साडेचार हजारहून अधिक मोदकांची ऑर्डर नोंदवली आहे.

मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-शिर्डी, सीएसएमटी-सोलापूर, सीएसएमटी-मडगाव आणि नागपूर-विलासपूर या मार्गावर ‘वंदे भारत’ ट्रेन चालवली जाते, तर पश्चिम रेल्वेकडून मुंबई सेंट्रल-अहमदाबाद या मार्गावर वंदे भारत ट्रेन धावते. गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रवाशांना गाडीत गणेशोत्सवाचा फिल यावा म्हणून प्रसाद म्हणून मोदक दिला जाणार असल्याची माहिती आयआरसीटीसीच्या अधिकाऱयांनी दिली. दरम्यान काही मोदक आयआरसीटीसीच्या सेंट्रल किचनमध्ये बनवण्यात येणार असून काही बाहेरून घेतले जाणार आहेत.