मुंबईकरांनो काळजी घ्या…डेंग्यू, मलेरिया, लेप्टोसह आता स्वाईन फ्लूचा ‘ताप’

मुंबईत गेल्या दीड महिन्यापासून पावसाळी आजारांनी बस्तान मांडले असताना ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ातही डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोसह आता स्वाईन फ्लूनेही डोके वर काढल्याचे समोर आले आहे. ऑगस्टच्या पहिल्याच आठवडय़ात डेंग्यूचे तब्बल 157, मलेरियाचे 226, लेप्टोच्या 75 रुग्णांसह स्वाईन फ्ल्यूचे 56 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पावसाने उसंत घेतली असतानाही पावसाळी आजार मात्र ठाण मांडून असल्याने मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

मुंबईत गेल्या संपूर्ण जुलै महिन्यात डेंग्यूचे 579, मलेरियाचे 721, लेप्टोचे 377, गॅस्ट्रोचे 1649, कावीळ 138, स्वाईन फ्ल्यू 86 आणि स्वाईन फ्लूचे 24 रुग्ण आढळले होते. ही रुग्णवाढ ऑगस्टमध्येही कायम असून सर्वच पावसाळी आजारांची संख्या वाढल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. पाकसाचे पाणी साचून राहत असल्याने दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफॉईड, कॉलरा, कावीळ असे आजार तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार पसरतात. पावसाळी आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

तीन हजार बेड तैनात

पावसाळी आजारांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालयांत एकूण तीन हजार बेड तैनात ठेवण्यात आले आहेत. यात उपनगरीय रुग्णालयांत विशेष 500 बेडही तैनात आहेत. तसेच संध्याकाळी 4 ते 6 ओपीडी सुरू ठेवण्यात येत आहे. शिवाय कीटकनाशक विभागाकडूनही पाकसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धूम्र फकारणी मोहीम व्यापकपणे राबवण्यात येत आहे.

आठवडाभरात आढळलेले रुग्ण

मलेरिया 226
लेप्टो 75
डेंग्यू 157
गॅस्ट्रो 203
काकीळ 6
स्काईन फ्लू 56
चिकनगुनिया 9