मराठी पाटी नसल्यास एक लाखापर्यंत दंड, पहिल्याच दिवशी 3269 दुकानांची झाडाझडती

 सर्वोच्च न्यायालयाने दुकाने-आस्थापनांवरील पाटय़ा मराठी करण्यासाठी दिलेली मुदत संपल्यामुळे पालिकेने आजपासून मुंबईत दुकाने-आस्थापनांची झाडाझडती सुरू केली. यामध्ये पहिल्याच दिवशी सर्व 24 वॉर्डमध्ये मिळून 3269 ठिकाणी तपासणी करण्यात आली. यामध्ये 176 ठिकाणी मराठी पाटी नसल्यामुळे कायदेशीर कारवाई करण्यात आली. दरम्यान, ही कारवाई आगामी काळात आणखी तीव्र केली जाणार असून कायद्यानुसार प्रतिकामगार दोन हजार याप्रमाणे जास्तीत जास्त एक लाखापर्यंतचा दंड होणार आहे, तर वारंवार दुर्लक्ष करणाऱयांकडून प्रतिदिन दोन हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे.

दुकाने-आस्थापनांवरील पाटय़ा मराठीत लावण्यासाठी देण्यात आलेली मुदत 25 नोव्हेंबर रोजी संपुष्टात आली. त्यामुळे पालिकेच्या दुकाने-आस्थापने विभागाकडून कारवाई सुरू करण्यात आली. यामध्ये सर्व 24 वॉर्डमध्ये दोन अधिकारी-कर्मचाऱयांच्या पथकाकडून कारवाई सुरू करण्यात आली. दरम्यान, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मार्च 2022 ला दुकाने-आस्थापनांवरील नामफलक मराठी भाषेत आणि ठळकपणे लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी 2018 च्या निर्णयानुसार दहा किंवा दहापेक्षा जास्त कामगार असलेल्या दुकानांवर मराठी पाटय़ा असणे बंधनकारक होते, मात्र नव्या नियमानुसार कर्मचाऱयांची संख्या कितीही असली तरी फलक मराठी भाषेतच असणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबईत सुमारे सात लाख दुकाने-आस्थापने आहेत. या सर्वांना हा नियम पाळणे बंधनकारक राहणार आहे.

बारला महान व्यक्ती, गडकिल्ल्यांची नावे नको

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) सुधारणा अधिनियम 2022 तील कलम 36 ‘क’ (1)च्या कलम 6 अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान-आस्थापनाला लागू असलेल्या कलम-7 नुसार मराठी भाषेतून नामफलक लावणे बंधनकारक आहे. यानुसार मद्यविव्रेत्या दुकानांनाही महान व्यक्ती किंवा गडकिल्ल्यांची नावे देता येणार नाहीत, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

24 वॉर्डमध्ये अशी झाली कारवाई

(विभागाचे नाव, पथकांनी दिलेल्या भेटी, नियमांची अंमलबजावणी केलेल्या आस्थापनांची संख्या, कारवाईची संख्या)
1 / 2 / 3) ए, बी, सी विभागः 300/297/3
4) डी विभाग ः 98/89/8
5) ई विभाग ः 101/97/4
6) एफ दक्षिण विभाग ः 147/142/5
7) एफ उत्तर विभाग ः 71/67/4
8) जी दक्षिण विभाग ः 195/186/9
9) जी उत्तर विभाग ः 178/174/4
10) एच पूर्व विभाग ः 127/117/10
11) एच पश्चिम विभाग ः 142/130/12
12) के पूर्व विभाग ः 165/154/11
13) के पश्चिम विभाग ः 271/264/7
14) एल विभाग ः 151/148/3
15) एम पूर्व विभाग ः 89/81/8
16) एम पश्चिम विभाग ः 155/149/6
17) एन विभाग ः 89/71/18
18) पी दक्षिण विभाग ः 189/180/9
19) पी उत्तर विभाग ः 103/96/7
20) आर दक्षिण विभाग ः 136/129/7
21) आर उत्तर विभाग ः 207/200/7
22) आर मध्य विभाग ः 155/145/10
23) एस विभाग ः 98/84/14
24) टी विभाग ः 103/93/10