20 घुसखोर बांगलादेशी नागरिकांना कारावास व दंडाची शिक्षा

बेकायदेशीरपणे दोन देशांची सीमारेषा ओलांडून हिंदुस्थानात घुसखोरी करणाऱ्या 20 बांगलादेशी नागरिकांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. बोरिवली पोलिसांनी सादर केलेल्या सबळ पुराव्यांच्या आधारे किल्ला कोर्ट, आठवे न्यायालयाने या बांगलादेशींना आठ महिने कारावास व चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

गेल्या नोव्हेंबरला बोरीवली पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुपचूप येऊन राहत असलेल्या तीन बांगलादेशींना पकडले होते. त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रदीप काळे, सपोनि साळुंखे व पथकाने त्या तिघांकडे कसून चौकशी केल्यावर आणखी घुसखोर बांगलादेशी नागरिकांची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने नालासोपारा, विरार, पुणे येथून आणखी 17 बांगलादेशींना पकडले होते. त्या सर्वांविरोधात भक्कम पुरावे जमा करून बोरिवली पोलिसांनी ते न्यायालयात सादर केले. त्याआधारे न्यायालयाने या 20 घुसखोर बांगलादेशींना अखेर आठ महिन्यांचा कारवास व चार हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या देशात पाठविले जाईल.