गुजरातने सोडलं, महाराष्ट्राने तारलं

जिद्दीने धावली आणि निरमाने नंबर वन पटकावला

>>आशिष बनसोडे

चमकदार कामगिरी होत नसल्याने गुजरातच्या क्रीडा अकादमीने तिला लांब केलं. हा तिला मोठा धक्का होता, पण ती खचली नाही. नाशिकच्या एकलव्य अकादमीत तिने प्रवेश केला अन् तिचे नशीब फळफळले. तिथे तिने रक्ताचे पाणी केले, त्याचेच फळ आज तिला मिळाले. मानाच्या मुंबई मॅरेथॉनमध्ये ती उतरली. महिलांच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये दोन तास 47 मिनिटांची यशस्वी धाव घेत निरमाबेन ठाकोरने पहिल्या क्रमांकाच्या पदकाला गवसणी घातली. पदक मिळविण्यासाठी पार केलेला खडतर प्रवास सांगताना निरमाला अश्रू अनावर झाले.

निरमा ही गुजरातच्या दाहोद जिह्यातील एका खेडय़ातली तरुणी. वडील शेतकरी, त्यामुळे त्यावरच त्यांचा चरितार्थ चालतो. निरमाने खेळात प्रावीण्य मिळवावे म्हणून तिच्या वडिलांचा तिला पूर्ण पाठिंबा असल्याने तिने लांब पल्ल्याची धावपटू होण्याचा निर्धार करीत गुजरातच्या क्रीडा अकादमीत प्रवेश केला. पण नियमानुसार पहिल्या तीन वर्षांत तिला म्हणावी तशी कामगिरी करता न आल्याने तिला अकादमीतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. हा तिला व तिच्या वडिलांना मोठा धक्काच होता, पण या बापलेकीने हार मारली नाही. वडिलांनी तीन लाखाचे कर्ज काढून निरमाला उत्तम धावपटू बनविण्यासाठी केनियाला पाठविले. केनियात ती तीन महिने राहिली आणि पुन्हा हिंदुस्थानात परतली.

…पण तिला वेळ साधता आली नाही

आज पहिला क्रमांक पटकाविण्याच्या जिद्दीनेच मॅरेथॉनमध्ये उतरले होते. मला फक्त आणि फक्त विजेतेपद दिसत होते. मी आले, धावले आणि जिंकले, अशी प्रतिक्रिया निरमाने दिली. हे यश माझ्यासाठी फार मोठे यश आहे. फक्त मला जी वेळ साधायची होती ती साधता आली नाही. शेवटचे तीन किमी असताना वातावरणात थोडी उष्णता वाढल्याने त्याचा परिणाम झाला. आणि गती मंदावल्याने वेळेचे गणित बिघडले, असे ती म्हणाली. गुजरातकडून खेळांवर भरपूर खर्च केला जातो, पण त्यांच्यालेखी मॅरेथॉनला दुय्यम स्थान आहे. मॅरेथॉनसारख्या खेळाला तितकेसे महत्त्व दिले जात नाही. पण महाराष्ट्राच्या मातीत आले आणि स्वप्न साकार झाले.