‘क्यूआर कोड’वर भटक्या कुत्र्यांची कुंडली

भटक्या कुत्र्यांची कुंडली आता ‘क्यूआर’ कोडवर मिळणार आहे. यासाठी भटक्या कुत्र्यांच्या गळय़ात ‘क्यूआर’ कोड पट्टय़ाच्या सहाय्याने घातला जाणार आहे. हा ‘क्यूआर’ कोड स्कॅन केल्यास कुत्र्याचे वय, दिलेल्या लसी, कुत्रा कुठल्या विभागातील आहे याची माहिती मिळणार आहे. यानुसार भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी मदत होणार आहे.

कुत्र्याला रेबीजचा आजार झाला असेल तर एखाद्याला चावला तर त्याच्या जिवावर बेतू शकते. त्यामुळे भटक्या कुत्र्यांना रेबीजचा डोस देण्यात येतो. तसेच कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी निर्बीजीकरण करण्यात येते. मात्र कुठल्या कुत्र्याला रेबीजचा डोस दिला, कुठल्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले याचा डेटा पालिकेकडे उपलब्ध होत नाही. मुंबईतील भटक्या कुत्र्यांची माहिती एकत्रित उपलब्ध व्हावी यासाठी प्रत्येक भटक्या कुत्र्याला ‘क्यूआर’ कोड व गळय़ात रेडियमचा पट्टा बांधण्यात येणार आहे. यासाठीचा प्रयोग मुंबई विमानतळ परिसरात करण्यात आला आहे. या ठिकाणच्या 300 हून अधिक भटक्या कुत्र्यांना ‘क्यूआर’ कोड देण्यात आला असून पट्टा गळय़ात बांधण्यात आला आहे. या ठिकाणचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पालिकेच्या 24 वॉर्डात याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे ही पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.